बौद्ध भिख्खूंचे महासंमेलन २६ला
By admin | Published: January 25, 2017 02:33 AM2017-01-25T02:33:56+5:302017-01-25T02:33:56+5:30
बुद्ध धम्माच्या प्रचार व प्रसाराचे कार्य करणारे बौद्ध भिख्खूंचा एकमेकांशी समन्वय स्थापित व्हावा व विचारांचे आदानप्रदान व्हावे
नागपूर : बुद्ध धम्माच्या प्रचार व प्रसाराचे कार्य करणारे बौद्ध भिख्खूंचा एकमेकांशी समन्वय स्थापित व्हावा व विचारांचे आदानप्रदान व्हावे या उद्देशाने येत्या २६ जानेवारीला बौद्ध भिख्खूंचे महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. वर्धा रोड, आसोलास्थित बुद्धनगरी येथे सकाळी ८ वाजता भदन्त आनंद महाथेरो यांच्या हस्ते महासंमेलनाचे उद््घाटन होणार असल्याची माहिती लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भैयाजी खैरकर व भंते प्रज्ञाशील महाथेरो यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी गुरू चंद्रमणी यांचे शिष्य भदन्त ज्ञानेश्वर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाने पाली विद्यापीठाची स्थापना करावी, वर्तमान स्थितीत बौद्धांचे विविध प्रश्न, तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्मिती, १९५६ च्या धर्मांतरणापूर्वी व धर्मांतरणानंतरच्या बौद्ध भिख्खूंमधील सामंजस्य आदी विषयावर या महासंमेलनात चर्चा केली जाणार असल्याचे भंते प्रज्ञाशील यांनी सांगितले. देशभरातून हजारो बौद्ध भिख्खू आणि आंबेडकरी कार्यकर्ते महासंमेलनात सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला नीना राऊत, सचिन मुन, राजू मुन, महेश नागपूरे, नरेंद्र खैरकर, वामन सोमकुवर, दत्ता गजभिये, प्रा. विनोद बागडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)