अधिवेशन नागपुरात की मुंबईत? ठोस निर्णय होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 07:10 AM2021-11-19T07:10:00+5:302021-11-19T07:10:01+5:30
Nagpur News विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की मुंबईत, ७ तारखेलाच होणार की तारीख वाढणार प्रश्न अनेक आहेत; परंतु या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत अधिवेशनाची तयारी तर सोडाच; परंतु दरराेजची कामेही अडकून पडली आहेत.
नागपूर : रविभवनात शौचालयांची स्थिती चांगली नाही, आमदार निवासातील फर्निचर दुरुस्त करायचे आहेत, हैदराबाद हाऊसला रंगरंगोटीची गरज आहे. साफ-सफाईसह दररोजची अनेक कामे आहेत; परंतु कुठलीही कामे सुरू नाहीत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की मुंबईत, ७ तारखेलाच होणार की तारीख वाढणार प्रश्न अनेक आहेत; परंतु या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत अधिवेशनाची तयारी तर सोडाच; परंतु दरराेजची कामेही अडकून पडली आहेत.
७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असल्याची घोषणा झाली होती; परंतु राज्य सरकार यासंदर्भात अजूनपर्यंत निर्णय घेऊ शकलेले नाही. बुधवारी झालेल्या बैठकीत २० डिसेंबरपासून चार दिवसांचे अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत चर्चा झाली. लोकमतने यासंदर्भात अगोदरच संकेत दिले होते; परंतु अधिकृतपणे मात्र सरकारने काहीही जाहीर केलेले नाही. अशा परिस्थितीत हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात कुठलाही पुढाकार घेण्यात आलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) ने तयारीची कामे थांबवून ठेवली आहेत. याासंदर्भात विभागातील अधिकाऱ्यांचा असा तर्क आहे की, अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय झाला तर तयारीवर होणारा खर्च वाया जाईल. प्रशासनासह आरोग्य विभागातील अधिकारीसुद्धा संभ्रमात आहेत. तयारी केवळ कागदांवर पूर्ण झाली आहे. प्रत्यक्षात मात्र तयारीच्या कामाला सुरुवातच झालेली नाही. अशा परिस्थितीत कमी वेळात शहराला हिवाळी अधिवेशनासाठी तयार करणे एक मोठे आव्हान ठरणार आहे.
कंत्राटदारांसाठी थोडी खुशी-थोडा गम
अधिवेशनाच्या तयारीच्या कामातील कंत्राटदारांसाठी थोडी खुशी-थोडा गम सारखी परिस्थिती आहे. निविदा भरल्यानंतरही काम सुरू न झाल्याने ते चिंतेत आहेत. कामांचे वर्क ऑर्डर लवकर निघावे, अशी त्यांची इच्छा आहे. दुसरीकडे २०१९ मध्ये झालेल्या अधिवेशनाची थकबाकीची जवळपास ३६ टक्के रक्कम परत मिळाली आहे. त्यांनी थकबाकी मिळावी यासाठी आंदोलन केले होते तसेच थकबाकी न मिळाल्यास अधिवेशन तयारीच्या कामांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता.