विदेशातील प्रवेशांवर संक्रांत

By admin | Published: October 5, 2016 02:58 AM2016-10-05T02:58:31+5:302016-10-05T02:58:31+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०३ व्या दीक्षांत समारंभाचा अद्याप मुहूर्त निघालेला नाही.

Convergence on foreign entry | विदेशातील प्रवेशांवर संक्रांत

विदेशातील प्रवेशांवर संक्रांत

Next

बाहेरील विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांकडे मूळ पदवीची मागणी : नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचा अद्याप मुहूर्तच नाही
योगेश पांडे  नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०३ व्या दीक्षांत समारंभाचा अद्याप मुहूर्त निघालेला नाही. त्यामुळे मागील वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना अद्यापपर्यंत पदवी प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली असून काही विद्यार्थ्यांच्या विदेशातील विद्यापीठांतील प्रवेशांवर संक्रांत आली आहे. बाहेरील विद्यापीठांनी मूळ पदवी सादर करण्याची दिलेली मुदत संपत आली असल्यामुळे आता पदवी कुठून आणावी असा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. जर ठराविक वेळेत पदवी सादर केली नाही तर मागील वर्षी घेतलेला प्रवेश अर्ध्यावरच सोडावा लागणार आहे.
मागील वर्षी नागपूर विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी विदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतले. काही विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील ‘सदर्न कॅलिफोर्निया’ विद्यापीठात प्रवेश घेतले. त्यावेळी विद्यार्थ्यांकडे मूळ पदवी नसल्यामुळे तात्पुरती पदवी त्यांनी सादर केली होती. संबंधित विद्यापीठाने त्यांना मूळ पदवी सादर करण्यासाठी एक वर्षाचा अवधी दिला होता. नागपूर विद्यापीठाचा १०३ वा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर ही पदवी आपण सहजपणे सादर करू असा विद्यार्थ्यांना विश्वास होता परंतु त्यांची ही अपेक्षाच फोल ठरली.नागपूर विद्यापीठाचा १०३ वा दीक्षांत समारंभ १ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली होती.
विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे अडचणी मांडल्या. आम्ही एकूण परिस्थिती सांगणारे पत्र लिहून दिले आहे. शिवाय तात्पुरते पदवी प्रमाणपत्रदेखील दिले आहे. परंतु अमेरिकेतील त्या विद्यापीठाला मूळ पदवी प्रमाणपत्रच हवे आहे. दीक्षांत समारंभ होत नाही, तोपर्यंत आम्ही पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. आमचे हात कायद्याने बांधलेले आहे. अमेरिकेतील विद्यापीठाचा भारतातील विद्यापीठांवर विश्वास नाही, हेच यावरून दिसून येत आहे.
- डॉ.सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू

लेटलतिफीचा फटका विद्यार्थ्यांना का ?
नागपूर विद्यापीठातून २०१५ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या एका विद्यार्थिनीने ‘सदर्न कॅलिफोर्निया’ विद्यापीठात ‘एमएस’साठी प्रवेश घेतला. तिचे एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु तिला मूळ पदवी न मिळाल्याने तिचा प्रवेश रद्द होण्याची चिन्हे आहेत. तिच्यासारखे आणखी विद्यार्थीदेखील तिथे आहेत. विद्यापीठाने १ आॅक्टोबरला जरी दीक्षांत समारंभ घेतला असता तरी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असता. परंतु मुख्य अतिथी न मिळाल्याने विद्यापीठाने हात वर केले. विद्यापीठाच्या लेटलतिफीचा विद्यार्थ्यांनी फटका का सहन करावा, असा प्रश्न संबंधित विद्यार्थिनीचे नातेवाईक पवन सारडा यांनी उपस्थित केला.

Web Title: Convergence on foreign entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.