बांबूला उद्योगात परिवर्तित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:09 AM2021-09-19T04:09:32+5:302021-09-19T04:09:32+5:30
नागपूर : भारतात जगातील ३० टक्के बांबू वनस्पतीचे उत्पादन होते. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, त्याचे उद्योगात रूपांतरण झालेले ...
नागपूर : भारतात जगातील ३० टक्के बांबू वनस्पतीचे उत्पादन होते. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, त्याचे उद्योगात रूपांतरण झालेले नाही. बांबूला उद्योगात परिवर्तित करण्याचे तंत्र विकसित करण्याची गरज असल्याचे मत बेंगळूरू येथील आयपीआयआरटीआयचे वैज्ञानिक डॉ. विपिनकुमार चावला यांनी व्यक्त केले.
जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब आॅफ नागपूर एलाईटच्या वतीने बांबू संवर्धन व विकासावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बांबू टेक्नोलॉजी या विषयावर आपले मत मांडत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड, नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक आयएफएस एम. श्रीनिवास राव होते. प्रमुख पाहुणे म्हणून वनराई फाऊंडेशनचे विश्वस्त गिरीश गांधी उपस्थित होते.
आशिया खंडात ६५ टक्के, भारतात ३० टक्के तर चीनमध्ये ३५ टक्के बांबूचे पिक घेतले जाते. चीनमध्ये पिकणारा बांबू उसासारखा असल्याने, त्याचे हार्वेस्टिंग चांगल्या प्रकारे होते. मात्र, भारतात बांबूचे हार्वेस्टिंग कठीण काम आहे. त्याअनुषंगाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राने मात्र, त्याअनुषंगाने उत्तम पाऊल टाकल्याचेही डॉ. विपिनकुमार चावला यावेळी म्हणाले.
यावेळी गिरीश गांधी म्हणाले, जगात बांबूच्या १४८ प्रजाती असून भारतात केवळ २९ प्रजातीच आहेत. बांबू पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. बांबूपासून तयार केलेल्या दागिन्यांवर पुणे येथील बांबू तंत्रच्या संस्थापिका दया पत्नी यांनी यावेळी बांबूच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकला.
या वेबिनारमध्ये रोटरी क्लब ऑफ नागपूर एलाईटचे अध्यक्ष शुभंकर पाटील, महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक एम. श्रीनिवास राव, डॉ. एन. भारती, सचिन गोडसे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन वनराई फाऊंडेशनचे अजय पाटील यांनी केले. गणेश हरीमकर यांनी मानले.