‘जीएसटी’ वाढविणार दीक्षांतचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:14 PM2017-11-14T22:14:35+5:302017-11-14T22:23:02+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ हा आतापर्यंत सर्वात महागडा ठरू शकतो. ‘जीएसटी’ तसेच इतर बाबींचा फटका विद्यापीठाला बसणार असून मागील वेळच्या तुलनेत यंदा खर्च दुप्पट होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ हा आतापर्यंत सर्वात महागडा ठरू शकतो. ‘जीएसटी’ तसेच इतर बाबींचा फटका विद्यापीठाला बसणार असून मागील वेळच्या तुलनेत यंदा खर्च दुप्पट होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. ‘एआयसीटीई’चे चेअरमन डॉ.अनिल सहस्रबुद्धे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. १०३ व्या दीक्षांत समारंभात पदके व पुरस्कार वगळता ६ लाख ५८ हजार रुपयांचा खर्च आला होता. पदके व पुरस्कार यांच्यावर सुमारे ७ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. यंदा ‘जीएसटी’ लागू झाल्याने तसेच इतर कारणांमुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. केवळ पदके व पुरस्कार यांच्यावर सुमारे १२ लाख रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. तर दीक्षांत समारंभाच्या आयोजनात १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वित्त व लेखा विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता ‘जीएसटी’मुळे खर्च वाढणार असल्याचे एका अधिकारयाने सांगितले. पदक व पुरस्कारांवर होणारा खर्च हा एकूण खर्चात समाविष्ट करण्यात येत नाही. दानदात्यांनी दिलेल्या निधीतून हा खर्च करण्यात येतो. दीक्षांत समारंभाच्या आयोजनासाठी अर्थसंकल्पात १५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. इतकी रक्कम खर्च होणार नाही, मात्र मागील वेळच्या तुलनेत नक्कीच यंदा जास्त खर्च होईल, असे वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांनी सांगितले.
दीक्षांत भट सभागृहातच
गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ हा डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहातच आयोजित करण्यात येतो. मात्र यंदा मनपाच्या नवनिर्मित सुरेश भट सभागृहात हे आयोजन करण्याचा कुलगुरूंचा मानस होता. ३ डिसेंबर रोजी तिथेच दीक्षांत समारंभ होणार असून विद्यापीठाने ‘बुकिंग’देखील केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुढील दीक्षांत फेब्रुवारीनंतरच
२०१७ साली अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन लगेच करण्यात येणार आहे. १०४ वा दीक्षांत समारंभ आटोपला की पुढील दीक्षांतची तयारी सुरु करण्यात येईल. साधारणत: फेब्रुवारी महिन्यात १०५ वा दीक्षांत समारंभ होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.