नागपूरकरांचा कुल संडे; @7.5
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:02 AM2020-01-13T11:02:03+5:302020-01-13T11:02:22+5:30
नागपुरातील रविवारची तापमानाची नोंद ७.६ अंश सेल्सिअस एवढी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकरांचा हा रविवार ‘कुल संडे’ ठरला. दिवसभर वाहणारे बोचरे वारे व त्यामुळे भरलेल्या हुडहुडीने नागपूरकर दिवसभर चांगलेच गारठले होते. नागपूरसह ब्रह्मपुरी आणि गोंदियातही तापमानाचा पारा नागपूरएवढाच खालावलेला होता.
नागपुरातील रविवारची तापमानाची नोंद ७.६ अंश सेल्सिअस एवढी झाली. सुटीचा दिवस असल्याने नागपूरकर एन्जॉयच्या मूडमध्ये असले तरी बोचऱ्या थंडीमुळे अनेकांनी बाहेर जाण्याचे टाळले. त्यामुळे एरवी रविवारी दिसणारी गर्दी कमी जाणवली. बर्डीवरील रविवारच्या बाजारावरही या गर्दीचा परिणाम जाणवला. सायंकाळी लवकरच येथील गर्दी कमी झालेली जाणवली.
विदर्भात गोंदियाचे तापमान सर्वात कमी म्हणजे ७.५ अंश सेल्सिअसखाली उतरले होते. नागपूरएवढेच ७.६ अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरीमध्येही नोंदविले गेले. गडचिरोलीचे तापमान ९.२ होते, तर वर्धामध्ये १० अंश, चंद्रपुरात १०.४ अंश, अमरावतीमध्ये ११.४ अंश आणि अकोल्यात ११.७ अंश सेल्सिअस अशी दिवसभराच्या तापमानाची नोंद करण्यात आली.
बुलडाणाचे तापमान विदर्भात सर्वाधिक १२.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्या खालोखाल यवतमाळात १२.४ आणि वाशिममध्ये १२ ७.६ अंश सेल्सिअस नोंद झाली.
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात पावसाची शक्यता नाही.
कडाक्याच्या थंडीने घेतला एकाचा बळी
कडाक्याच्या थंडीत उघड्यावर राहणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीचा (वय अंदाजे ३५ ते ४०) गारठून मृत्यू झाला. रविवारी सकाळी तो निपचित पडलेला सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या परिसरात आढळला. त्याला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सीतबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.