तापमान वाढताच कूलर खरेदी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:07 AM2021-04-03T04:07:24+5:302021-04-03T04:07:24+5:30
नागपूर : गेल्या वर्षी उन्हाळ्यात संपूर्ण लॉकडाऊनमुळे ग्राहक कूलर खरेदीसाठी घराबाहेर पडले नाही. हीच स्थिती यावर्षीही होण्याच्या भीतीने लोक ...
नागपूर : गेल्या वर्षी उन्हाळ्यात संपूर्ण लॉकडाऊनमुळे ग्राहक कूलर खरेदीसाठी घराबाहेर पडले नाही. हीच स्थिती यावर्षीही होण्याच्या भीतीने लोक होळीनंतर कूलर खरेदीसाठी घराबाहेर निघाले असून, सर्वच उत्पादक आणि विक्रेत्यांकडे कूलर खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसून येत आहे. यंदा कच्च्या मालाच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यासोबत किमतीही वाढल्या. कूलरच्या किमती वाढल्यानंतरही लोकांची खरेदी वाढल्याने कूलर व्यवसायी खूश असून गेल्या वर्षीचा आर्थिक बॅकलॉग भरून निघेल, अशी अपेक्षा व्यावसायिकांना आहे.
नागपुरात तापमान ४१ डिग्रीवर गेल्यानंतर गेल्या वर्षी थांबलेले ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. त्यामुळे कॉटन मार्केटसह सर्वच कूलरच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. नागपुरात दररोज तीन हजारापेक्षा जास्त कूलरची विक्री होत आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी संपुष्टात आलेल्या कूलर व्यवसायात उत्साह संचारल्याचे उत्पादक आणि विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात उंचीनुसार ३ हजारापासून १५ हजारापर्यंत कूलर उपलब्ध आहेत. याशिवाय ब्रॅण्डेड फायबर कूलरही विक्रीस आहेत. लोक आर्थिक बजेटनुसार आणि कुटुंबाच्या गरजेनुसार खरेदी करीत आहेत. होळीच्या एक आठवड्यापूर्वीच कूलर विक्री सुरू झाली, पण होळीनंतर विक्री वाढली आहे.
लॉकडाऊनच्या भीतीने व्यापारी चिंतित
कोरोना रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊनच्या भीतीने उत्पादक आणि विक्रेते चिंतित आहेत. गेल्या वर्षीसारखी स्थिती होऊ नये, अशी त्यांना चिंता आहे. हा व्यवसाय सीझनेबल आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणारा व्यवसाय जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असतो. नागपूर कूलरसाठी मोठी बाजारपेठ आहे. नागपूर जिल्ह्यात ५०० पेक्षा जास्त लहान-मोठे उत्पादक आहे. नागपुरातून संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशात कूलर विक्रीसाठी जातात. या माध्यमातून जवळपास ५०० कोटींची उलाढाल होते.
वूडवूल व खसताटीची मागणी वाढली
कूलरसोबतच जुन्या कूलरकरिता वूडवूल आणि खसताटीची मागणी वाढली आहे. वूडवूल आणि खसताटीची विक्री करणारे शहरात रस्त्याच्या कडेला अनेक विक्रेते दिसून येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या वूडवूल दर्जानुसार ४० ते ६० रुपये किलो किमतीत उपलब्ध आहे.
गेल्या वर्षीचा बॅकलॉग भरून निघेल
हा व्यवसाय सीझनेबल असल्याने कूलर उत्पादक व विक्रेत्यांवर लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. त्यामुळे थोडा नफा घेऊन कूलरची विक्री करीत आहे. वाढत्या तापमानामुळे लोकांची खरेदी वाढली आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये उत्साह आहे. चांगल्या विक्रीची अपेक्षा आहे. कच्चा माल महाग झाल्याने यंदा किमती वाढल्या आहेत. प्रशासनाने लॉकडाऊन लावू नये.
श्रीकांत खंते, कूलर व्यावसायिक.
लॉकडाऊन व वेळेची मर्यादा नकोच
यंदा कूलरचे चांगले उत्पादन झाले असून विक्रीसाठी उत्सुक आहोत. पण विक्रेत्यांमध्ये गेल्या वर्षीसारखी लॉकडाऊनची भीती आहे. यंदा प्रशासनाने लॉकडाऊन आणि वेळेची वेळेची मर्यादा टाकू नये. कारण या व्यवसायात ५० हजारापेक्षा जास्त लोक गुंतले आहेत. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. यंदा कच्चा माल महागल्याने कूलरच्या किमतीत वाढ झाली आहे.
राजेश अवचट, कूलर व्यावसायिक.