पार्सलच्या कंत्राटाविरुद्ध कुलींची जनहित याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:08 AM2020-12-22T04:08:21+5:302020-12-22T04:08:21+5:30
नागपूर : पार्सल, सामान उचलणे हा कुलींचा अधिकार असून रेल्वे प्रशासनाने एका खासगी कंपनीला पार्सल उचलण्याचे कंत्राट दिले आहे. ...
नागपूर : पार्सल, सामान उचलणे हा कुलींचा अधिकार असून रेल्वे प्रशासनाने एका खासगी कंपनीला पार्सल उचलण्याचे कंत्राट दिले आहे. रेल्वे प्रशासनाच्या विरुद्ध कुलींनी आपला रोष व्यक्त केला असून, यामुळे कुलींवर उपासमारीची वेळ येणार असल्यामुळे रेल्वे कुली कल्याणकारी सेवा संस्थेच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर जवळपास १५० कुली तीन पाळ्यात काम करतात. कोरोनामुळे रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाली आहे. यातच कोरोनाच्या धास्तीमुळे प्रवाशांनी कुलींना सामान उचलण्यास देणेही कमी केले आहे. याचा कुलींवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे हा यक्षप्रश्न असताना रेल्वे प्रशासनाने एका खासगी कंपनीला पार्सल उचलण्याचे कंत्राट दिले आहे. या कंत्राटानुसार संबंधित कंपनीचे कर्मचारी नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे पार्सल घेऊन ते रेल्वेगाडीपर्यंत पोहोचविणार आहेत. यात कुलींचा रोजगार हिसकावल्या जाणार आहे. या निर्णयाचा नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींनी जोरदार विरोध केला आहे. पार्सल उचलण्याचा अधिकार कुलींचा आहे. त्यामुळे कुलींना सोडून हे काम देणे चुकीचे असल्याचे मत रेल्वेस्थानकावरील कुलींनी व्यक्त केले आहे. रेल्वेने खासगी कंपनीला कंत्राट देण्यापूर्वी कुलींना रेल्वेत ग्रुप डीमध्ये नोकरी देण्याची मागणी केली आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी रेल्वेस्थानकावरील रेल्वे कुली कल्याणकारी सेवा संस्थेच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अब्दुल माजीद शेख यांनी दिली आहे.
............