थंडीत गॅस सिलिंडरची चणचण
By admin | Published: December 28, 2015 03:20 AM2015-12-28T03:20:52+5:302015-12-28T03:20:52+5:30
कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्या बाजारात सुरू असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या विक्रीकडे शासनाच्या अधिकाऱ्यांनी
काळ्या बाजारात विक्री : हॉटेल्स व चारचाकी वाहनांमध्ये वापर
नागपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्या बाजारात सुरू असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या विक्रीकडे शासनाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ऐन थंडीच्या दिवसात आणि सणासुदीत घरगुती गॅस सिलिंडरची चणचण जाणवत आहे. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतरही एजन्सीसमोर ग्राहकांचा रांगा दिसून येत आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन आॅईल कॉर्पोरेशन या तिन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या तक्रारी सोडवाव्यात, अशी मागणी ग्राहक संघटनांनी केली आहे. ग्राहकांना न्याय न मिळाल्यास वरिष्ठांकडे न्याय मागू, अशा इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
चक्क रस्त्यांवर सिलिंडरची विक्री!
थंडीच्या दिवसात घरगुती गॅस सिलिंडरला जास्त मागणी असते. वीज परवडत नसल्याने गॅसच्या गिझरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काळ्या बाजारात एक हजारात सिलिंडर विकल्या जात आहे. शहरातील सर्वच हॉटेल्स, टपरी आणि चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे सिलिंडरच्या डिलेव्हरीला तब्बल १५ दिवस लागत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीतर्फे गॅसचा सुरळीत पुरवठा सुरू आहे. टंचाई कशामुळे होत आहे, याची शहानिशा करावी लागेल. अधिकाऱ्यांना न घाबरता डिलेव्हरी बॉय रस्त्यावर गाड्या उभ्या करून एक हजारात सिलिंडरची विक्री करीत असल्याचे दिसून येते. एजन्सीच आम्हाला सिलिंडर विक्रीसाठी उपलब्ध करून देतात, असे डिलेव्हरी बॉयचे म्हणणे असल्याने त्यांची हिंमत वाढली आहे.
प्रशासनाने लक्ष द्यावे
व्यावसायिकांना मात्र जादा पैसे देऊन घरगुती सिलिंडर वेळेवर मिळत आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना जादा पैसे देऊनही सिलिंडर मिळणे अवघड झाले आहे. सिलिंडर वितरण व्यवस्थेकडे महसूल प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु ही जबाबदारी संबंधित अधिकारी घेण्यास टाळाटाळ करीत आहे. अर्थपूर्ण व्यवहार होत असल्यामुळे डोळेझाक होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. वितरक आणि ग्राहकांमध्ये वाद सुरू असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. ‘गाडी आली नाही’ असे सांगून सिलिंडर नाकारले जात आहे. गॅस एजन्सींनी आपले मनमानी धोरण राबवून ग्राहकांची अडवणूक सुरू केली असून त्यावर नियंत्रण ठेवायला हवे, असे मत एका ग्राहकाने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
वाहनांमध्ये घरगुती गॅस
घरगुती ग्राहकांना स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसताना वाहनधारक व व्यावसायिक वापरासाठी मात्र या गॅसचा सर्रास उपयोग सुरू असल्याचे दिसून येते. शहरात गॅसचे पंप फार कमी आहेत. या तुलनेत गॅसवर धावणाऱ्या गाड्या जास्त आहेत. जीवनावश्यक कायद्यांतर्गत स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस वाहनांमध्ये वापरता येत नाही. टपरीचालक, चहाची दुकाने, कॅन्टीन, उपाहारगृह आणि हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडरचा उघड वापर केला जात आहे.
२४२२ रुपयात नवे गॅस कनेक्शन!
हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत गॅस, इंडियन आॅईल या तिन्ही कंपन्यांतर्फे १ जानेवारी २०१५ पासून सबसिडीचे नवीन घरगुती गॅस कनेक्शन देणे सुरू आहे. काही कागदपत्रांची पूर्तता करून ग्राहकाला नवीन कनेक्शन केवळ २४२२ रुपयात विकत घेता येते. त्यात एजन्सीकडून गॅस शेगडी घेणे बंधनकारक नाही. ग्राहकाला हक्काची सेवा पुरविण्यात एजन्सी सक्षम नसेल तर त्या एजन्सीची तक्रार कंपनीकडे करता येईल. कनेक्शन संपल्याची कारणे देऊन कनेक्शन नाकारणाऱ्या एजन्सींवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सेवा न देणाऱ्या एजन्सीची ग्राहकांनी कंपनीकडे बेधडक तक्रार करावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.