शहरालगतच्या अतिक्रमणांना नियमानुकूल करताना समन्वय ठेवा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:31+5:302021-07-14T04:09:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरालगतच्या वस्त्यांमधील अतिक्रमणांना सर्वांसाठी घरे धोरणाची पूर्तता करताना नियमानुकूल करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरालगतच्या वस्त्यांमधील अतिक्रमणांना सर्वांसाठी घरे धोरणाची पूर्तता करताना नियमानुकूल करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र हे करत असताना सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून शासकीय नियमानुसार कार्यवाही करावी. या कार्यवाहीचा कालावधी निश्चित करावा, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सोमवारी येथे केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत हाेते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी आर. विमला, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे उपस्थित होते.
अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या वेगवेगळ्या कार्य आदेशाची सुलभ अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभागाच्या पुनर्वसन अधिकारी व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून प्रक्रियेला अंतिम स्वरूप द्यावे, असे निर्देश सुनील केदार यांनी दिले. शुक्रवारपर्यंत यासंदर्भात स्पष्ट निर्देश प्रशासनाने जारी करावे असेही, स्पष्ट केले.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय’ अद्ययावत होणार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र अद्ययावत व सुसज्ज करण्यासाठी अपूर्ण असलेले बांधकाम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल. मध्य भारतातील रुग्णांना येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी सोमवारी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कॅन्सर रिलीफ सोसायटीच्या बैठकीमध्ये यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचे ‘फ्यूचर फॉरवर्ड कम्युनिटी एम्पॉवरमेट’ हे पुस्तक पशुसंवर्धन मंत्री केदार व सोसायटीच्या सदस्यांना भेट देण्यात आले.