शासकीय तंत्रनिकेतन व ‘डीव्हीईटीत समन्वय करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 09:22 PM2020-07-04T21:22:33+5:302020-07-04T21:23:47+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाच्या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन नागपूर आणि जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण (डीव्हीईटी) कार्यालय नागपूर यांच्यामध्ये समन्वय करार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाच्या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन नागपूर आणि जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण (डीव्हीईटी) कार्यालय नागपूर यांच्यामध्ये समन्वय करार करण्यात आला. शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. दीपक कुळकर्णी आणि जिल्हा व्यावसयिक शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्या अधिकारी एस. एन. ठोंबरे यांच्यामध्ये हा करार झाला. शासकीय तंत्रनिकेतनचे आॅटोमोबाईल्स इंजिनियरिंगचे विभाग प्रमुख डॉ. जी. के. आवारी आणि प्रा. समीर तेलंग यांच्या उपस्थितीत करार हस्तांतरण करण्यात आले. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा व्यक्तिमत्व विकास, तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण व विकास तसेच दोन्ही संस्थांद्वारे दिल्या जाणाºया सेवा क्षेत्रात लोककल्याणासाठी काही प्रकल्प चालवणे हे राज्य शासनाच्या दोन आस्थापनांमध्ये झालेल्या या कराराचे उद्दिष्ट असल्याचे प्रा. कुळकर्णी म्हणाले. या करारामुळे दोन्ही संस्थांना सुसंवाद साधण्यासाठी तसेच विद्यार्थी व कर्मचारी वर्गासाठी आवश्यक कौशल्याची देवाण घेवाण करण्याकरिता मोठी मदत होईल, असे मत आॅटोमोबाइल इंजिनियरिंगचे प्रा. डॉ. जी. के . आवारी यांनी व्यक्त केले.