लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वय हवा
By Admin | Published: February 26, 2016 03:06 AM2016-02-26T03:06:21+5:302016-02-26T03:06:21+5:30
लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना भेटतात
विशेषाधिकार समितीची अनौपचारिक चर्चा : समिती प्रमुख नीलम गोऱ्हे यांचे मत
नागपूर : लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना भेटतात तेव्हा ते समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने कालबद्धता पाळल्यास विशेषाधिकार भंगाचे प्रकार टाळता येणे शक्य आहे. असे मत विधान परिषद विशेषाधिकार समिती प्रमुख तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
रविभवन येथील सभागृहात शासकीय विभाग प्रमुखांसोबत आयोजित अनौपचारिक चर्चेच्यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे या बोलत होत्या. यावेळी विशेषाधिकार समितीचे सदस्य विजय ऊर्फ भाई गिरकर, शरद रणपिसे, श्रीकांत देशपांडे तसेच आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, नागो गाणार, प्रा. अनिल सोले, प्रकाश गजभिये, गिरीश व्यास, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, विभागीय आयुक्त अनुप कुमार आदी उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, शिक्षण विभागाविषयी ज्या अनेक तक्रारी आहेत त्यासाठी विशेषाधिकार समितीची वेगळी बैठक घेण्यात येईल. यासोबतच पोलीस विभाग राबवित असलेल्या गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क व प्रणाली (सीसीटीएनएस) या पद्धतीविषयी त्या-त्या जिल्ह्यातील विधान परिषद सदस्यांना सादरीकरणाद्वारे माहिती देण्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी सूचना उपस्थित पोलीस अधीक्षकांना यावेळी केली.
अधिकाऱ्यांनी कायद्याच्या तरतुदीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सार्वजनिक समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. प्रशासनात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींसोबत सौजन्यपूर्वक वागणूक तसेच त्यांनी दिलेल्या पत्राची तातडीने दखल घेऊन पोच देण्याच्या कामी सुद्धा तत्परता दाखवावी, अशी सूचनाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
आ. नागो गाणार, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास यांनी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा यावेळी व्यक्त केल्या.
बैठकीत जिल्हाधिकारी सर्वश्री डॉ. दीपक म्हैसेकर(चंद्रपूर), आशुतोष सलील(वर्धा), डॉ. विजय सूर्यवंशी(गोंदिया), पोलीस अधीक्षक अनंत रोकडे(नागपूर), अंकित गोयल(वर्धा), शशिकुमार मीना(गोंदिया), चंद्रपूर मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, डॉ. महेंद्र कल्याणकर, राजेंद्र निंबाळकर, दिलीप गावडे तसेच सुनील पडोळे, जी. एम.तळपाडे, अपर आयुक्त हेमंत पवार आणि विधान मंडळाचे विधी उपसचिव नंदलाल काळे, अवर सचिव उमेश शिंदे आदी उपस्थित होते.