कर्करोगतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांमध्ये समन्वय आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:24 PM2019-03-16T23:24:55+5:302019-03-16T23:27:17+5:30
इंडियन फर्टिलिटी सोसायटी-विदर्भ चॅप्टर (आयएफएस-व्हीसी) च्यावतीने ‘कॅन्सर आणि प्रजनन क्षमता संवर्धन’ विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयाच्या तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले. नागपूरचे ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. आनंद पाठक यांनी ‘कॅन्सर रुग्णांच्या प्रजनन क्षमता’ विषयावर मार्गदर्शन केले. केवळ कॅन्सरमुळेच नाही तर आजारासाठी घेतल्या जाणाऱ्या किमोथेरेपी, रेडिओथेरेपी आदी उपचार पद्धतीमुळेही स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही लैंगिक क्षमता बिघडण्याची, प्रजनन क्षमता अनियमित होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पाठक यांनी अधोरेखित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडियन फर्टिलिटी सोसायटी-विदर्भ चॅप्टर (आयएफएस-व्हीसी) च्यावतीने ‘कॅन्सर आणि प्रजनन क्षमता संवर्धन’ विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयाच्या तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले. नागपूरचे ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. आनंद पाठक यांनी ‘कॅन्सर रुग्णांच्या प्रजनन क्षमता’ विषयावर मार्गदर्शन केले. केवळ कॅन्सरमुळेच नाही तर आजारासाठी घेतल्या जाणाऱ्या किमोथेरेपी, रेडिओथेरेपी आदी उपचार पद्धतीमुळेही स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही लैंगिक क्षमता बिघडण्याची, प्रजनन क्षमता अनियमित होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पाठक यांनी अधोरेखित केले. नागपूर टेस्ट ट्यूब बेबी केंद्राच्या संचालक डॉ. साधना पटवर्धन यांनी ‘प्रजनन क्षमतेचे वैद्यकीय पैलू’ विषयावर भाष्य करताना अशा रुग्णांसाठी असलेल्या क्रायोप्रिजर्वेशनच्या पर्यायावर प्रकाश टाकला. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता गुप्ते व आयएफएस-व्हीसीच्या सचिव डॉ. शिल्पी सूद उपस्थित होत्या.
नवी दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलच्या एआरटी केंद्राचे प्रमुख व संचालक प्रा. कर्नल पंकज तलवार यांनी ‘प्रजनन क्षमता संवर्धनाचे तंत्रज्ञान’ विषयावर माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. प्रजनन क्षमता संवर्धन हे सामूहिक कार्य आहे. त्यासाठी कर्करोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, शुक्राणूशास्त्र तज्ज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ एकत्र येऊन रुग्णाची प्रजनन क्षमता सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. समन्वय व समग्र दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. आयजीजीएमसीचे सहायक प्रा. डॉ. अमोल डोंगरे यांनी ‘प्रजनन क्षमता व्यवस्थापनासमोरील आव्हाने’ या विषयावर विचार मांडले. कुटुंबीयांना या सर्व गोष्टीबाबत जाणीव देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. डॉ. निर्मला वझे आणि डॉ. कालिदास परशुरामकर हे सत्राचे अध्यक्ष होते. यानंतर ‘प्रजनन क्षमता संवर्धनाबाबत सत्य आणि संभ्रम’ या विषयावर कर्करोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ व भ्रूणशास्त्र तज्ज्ञांचे पॅनल डिस्कशन घेण्यात आले. प्रा. कर्नल पंकज तलवार हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या चर्चासत्रात डॉ. दर्शना पवार, डॉ. तनुश्री जैन, डॉ. नरेश जाधव, डॉ. अनिता साल्पेकर, डॉ. बिंदू चिमोटे हे सहभागी होते. वसुंधरा फर्टिलिटी सेंटरचे संचालक व आयएफएस-व्हीसीचे संस्थापक सदस्य डॉ. नटचंद्र चिमोटे व डॉ. ए. गंजू हे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बिंदू चिमोटे यांनी सर्व परिषदेचे संचालन केले तर आयएफएस-व्हीसीचे सहसचिव डॉ. निषाद चिमोटे यांनी आभार मानले.