नागपुरात उभारणार ‘कोरन टाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 09:26 PM2020-03-06T21:26:02+5:302020-03-06T21:27:05+5:30
नागपूर, मुंबई व पुणे येथे बंद पडलेल्या शाळा, महाविद्यालयाच्या इमारतीत ‘कोरन टाईन’ उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. साईनाथ भोवरे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’चे भारतातही रुग्ण आढळल्याने देशभरात उपाययोजना सुरू आहे. आता राज्य शासनानेही नागपूर, मुंबई व पुणे येथे बंद पडलेल्या शाळा, महाविद्यालयाच्या इमारतीत ‘कोरन टाईन’ उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. साईनाथ भोवरे यांनी दिली.
कोरोना संसर्गजन्य आजारावर उपाययोजना सुरू असतानाच विशेषत: परदेशी नागरिकांवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. कुठल्याही व्यक्तीमध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळल्यास त्याला तात्काळ आरोग्य पथकाकडे पाठविले जाईल. शिवाय मुंबई पाठोपाठ पुणे, नागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे शासनाने निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोनाबाबत नमुने तपासण्याची सुविधा मेयोमध्ये करण्यात आली आहे. भविष्यातील धोका ओळखून बंद पडलेल्या शाळा, कॉलेजच्या इमारतीत कोरन टाईन उभारण्यात येणार आहे. येथे संशयित रुग्णांना ठेवले जाणार आहे. मेडिकलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचाराची सोय असून मेयोमध्ये लवकरच यंत्रणा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोनाबाबतच्या जाणीव जागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात आली असून शाळा, सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे व बसस्थानक या ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येणार आहे.
यात्रा टाळा
कोरोना आजार संसर्गजन्य असल्याने गर्दीच्या ठिकाणी फैलाव होण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे गर्दीची ठिकाणे टाळणे आवश्यक आहे. अनेक यात्रांमध्ये परदेशी नागरिक दर्शन किंवा पर्यटनासाठी येतात़ त्यादृष्टीने या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे़ याठिकाणी एमबीबीएस डॉक्टरसह पाच ते सहा जणांचे पथक तैनात ठेवण्याच्या सूचना आहे़ यात्रेत भाविकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार आहे.