कोराना विषाणूचा घरातील कर्त्या पुरुषावरच घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 08:23 PM2020-10-09T20:23:26+5:302020-10-09T20:26:02+5:30
Corana virus attack, Nagpur News कोरोनाची सर्वाधिक लागण ३० ते ५० वयोगटामध्ये झाली आहे. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी नोंद झालेल्या ८६३८१ रुग्णांपैकी या वयोगटातील ३४३८२ रुग्णांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची सर्वाधिक लागण ३० ते ५० वयोगटामध्ये झाली आहे. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी नोंद झालेल्या ८६३८१ रुग्णांपैकी या वयोगटातील ३४३८२ रुग्णांचा समावेश आहे. याचे प्रमाण ३९.८० टक्के आहे. तर ५० व त्यापुढील वयोगटात १८६२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याची टक्केवारी ७६.१२ टक्के आहे. कोरोना विषाणू घरातील कर्त्या पुरुषावरच घाला घालीत असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे.
जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरूवात झाली. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने वेग धरला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित व मृत्यूच्या संख्यची विक्रमी नोंद झाली. परंतु ऑक्टोबर महिन्याच्या या आठ दिवसांत कोरोनाचा जोर कमी होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु गाफील राहू नका, पुढे हिवाळा आहे. थंडीच्या दिवसात विषाणू अधिक काळापर्यंत जिवंत राहत असल्याने अधिक काळजी घेणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे. उपलब्ध माहितीनुसार, ० ते १५ वयोगटात ५६९२ रुग्ण (६.५० टक्के), १६ ते ३० वयोगटात २१६०३ (२५.०१ टक्के), ५० वर्षांवरील वयोगटात २४४०३ (२८.२५ टक्क) रुग्णांची नोंद झाली आहे. ३०१ बाधितांच्या वयोगटाची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
० ते १५ वयोगटात ७ मृत्यू
नागपूर जिल्ह्यात बाधितांच्या मृतांची संख्या २४४६ वर पोहचली आहे. यात पाच दिवसांच्या चिमुकल्यांपासून ते १०२ वर्षांच्या वृद्धेच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ० ते ७ वयोगटात ७, १६ ते ३० वयोगटात ७१, ३१ ते ५० वयोगटात ५०६, बाधितांचा मृत्यू झाला आहे. ५० वर्षांवरील वयोगटातील सर्वाधिक मृत्यूला अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग तसेच फुफ्फुसांचे आजार कारणीभूत ठरला आहे.
गाफील राहू नका
शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाबाधितांसोबतच मृत्यूची संख्या कमी होऊ लागली आहे. परंतु गाफील राहू नका. कोरोनाचे संकट टळलेले नाही. प्रत्येकाने घराबाहेर पडताना नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. यात मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, चेहऱ्याला हात न लावणे व वारंवार हात धूत राहणे किंवा सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे.
डॉ. संजय जयस्वाल
उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर