कोथिंबीर, हिरव्या मिरचीने बिघडले भाज्यांचे बजेट
By मोरेश्वर मानापुरे | Published: June 2, 2024 08:37 PM2024-06-02T20:37:25+5:302024-06-02T20:42:20+5:30
- किरकोळमध्ये कोथिंबीर २०० रुपये, हिरवी मिरची ८० रूपये
नागपूर : कडक उन्हाळ्यात भाजीपाल्यांच्या दरवाढीने गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. सध्या कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांचे भाव आकाशाला भिडले असून किरकोळमध्ये कोथिंबीर २०० रुपये आणि हिरव्या मिरचीची ८० ते ९० किलो दराने विक्री होत आहे. किरकोळमध्ये काही भाज्यांचे भाव जास्तच आहेत. काही महिन्यांआधी टोमॅटो सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते, हे विशेष.
कळमना बाजार तीन दिवस बंद
मतमोजणीमुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील सातही बाजाराचे व्यवहार ५ जूनपर्यंत बंद आहेत. मुख्यत्त्वे फळे आणि भाज्यांची आवक बंद राहिल्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. लगतचे जिल्हे आणि अन्य राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांनी भाज्या कळमना बाजारात विक्रीसाठी आणणे बंद केले आहे. त्याच कारणांनी कॉटन मार्केटमध्ये आवक वाढली आहे.
३०० पोते मिरची तर कोथिंबीरची आवक फार कमी
महात्मा फुले फळ व सब्जी अडतिया असोसिएशनचे (कॉटन मार्केट) सचिव राम महाजन म्हणाले, सध्या बाजारात ६० ते ७० लहानमोठ्या गाड्या विक्रीसाठी येत आहे. दरदिवशी ८०० पोत्यांपर्यंत (प्रति पोते ४० किलो) होणारी आवक सध्या ३०० वर आली आहे. पंजाब आणि रायपूरहून आवक आहे. किरकोळमध्ये ८० ते ९० रुपये भाव आहे. किरकोळमध्ये कोथिंबीर २०० रुपयांवर गेल्यामुळे गृहिणींनी खरेदी थांबविली आहे. सध्या थोडीफार आवक छिंदवाडा, सौंसर, रामकोना या भागातून होते. सध्या लिंबू दर्जानुसार ५०० ते ६०० रुपये शेकडा आहे. किरकोळमध्ये १० ते १२ रुपये नग भाव आहे.
पालेभाज्या महागच
कडक उन्हामुळे आवक कमी असल्याने पालेभाज्या महाग आहेत. किरकोळमध्ये पालक ७० ते ८०, मेथी १००, चवळी ४०, घोळ भाजी ५० रुपये किलो आहे.
रायपूर, दुर्ग, भिलई येथून ढेमसची आवक परवळ, टोंडले, ढेमस, कारले, दोडके, लवकी मध्यप्रदेशच्या राजनांदगाव, रायपूर, दुर्ग, भिलई येथून विक्रीसाठी येत आहे. तर जबलपूर येथून बीन्स शेंग तर फणस ओरिसा येथून येत आहे. अन्य भाज्यांची आवक स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून सुरू आहे. ठोकमध्ये भाव आटोक्यात तर किरकोळमध्ये दुप्पट भावात विक्री होत आहे.
भाज्यांचे प्रति किलो भाव :
भाजीपाला ठोक भाव किरकोळ भाव
कोथिंबीर १४० २००
हिरवी मिरची ५० ८०-९०
टोमॅटो २० ३०-४०
फूल कोबी २० ४०
कारले ३० ५०
सिमला मिरची ३० ५०-६०
परवळ २५ ४०-५०
टोंडले २० ४०
ढेमस ३० ५०
दोडके ३० ५०
कोहळं १० २०
लवकी १० २०
फणस ४० ७०
चवळी शेंग २५ ४०
गवार ४० ७०
बीन्स शेंग ६० १००
पालक ३० ५०
मेथी ६० १००
घोळ २० ३०-४०
चवळी २० ३०-४०
कैरी २५ ४०
काकडी १५ २५-३०
मूळा २० ३०-४०
गाजर ३० ५०