नागपुरातील मका व्यापाऱ्याला अडीच कोटीचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 10:41 PM2019-05-28T22:41:09+5:302019-05-28T22:42:11+5:30
इतवारीतील एका मका व्यापाऱ्याला वाराणशीच्या एका व्यापाऱ्याने अडीच कोटीचा गंडा घातला. त्याने रक्कम देण्यासाठी तब्बल सहा महिन्यांपासून टाळाटाळ चालविल्याने, अखेर स्थानिक व्यापाऱ्याने लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदविली. अवधेश हरिश्चंद्र जयस्वाल (वय ४५) असे आरोपी व्यावसायिकाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळच्या अवध गर्वी, सोनपुरा येथील रहिवासी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारीतील एका मका व्यापाऱ्याला वाराणशीच्या एका व्यापाऱ्याने अडीच कोटीचा गंडा घातला. त्याने रक्कम देण्यासाठी तब्बल सहा महिन्यांपासून टाळाटाळ चालविल्याने, अखेर स्थानिक व्यापाऱ्याने लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदविली. अवधेश हरिश्चंद्र जयस्वाल (वय ४५) असे आरोपी व्यावसायिकाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळच्या अवध गर्वी, सोनपुरा येथील रहिवासी आहे.
राकेश लक्ष्मीनारायण अग्रवाल (वय ५६) असे तक्रार करणाऱ्या मका व्यापाऱ्याचे नाव आहे. ते स्वामीनारायण एन्क्लेव्ह, श्रीराम चौक वाठोडा येथे राहतात. त्यांचे इतवारीतील अमरदीप टॉकीजजवळ जयभवानी ट्रेडिंग आणि जान्हवी अॅग्रो इंडस्ट्रीज नावाने व्यापारी प्रतिष्ठान आहे. येथील धान्यबाजारातून अग्रवाल यांचा मक्याच्या खरेदी-विक्रीचा मोठा व्यवसाय चालतो. सहा महिन्यांपूर्वी आरोपी जयस्वालने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना मोठ्या प्रमाणावर मका खरेदी करायचा आहे, असे सांगितले होते. प्रारंभीचे व्यवहार चांगले झाल्याने अग्रवाल यांनी जयस्वालवर विश्वास ठेवला. जयस्वालने मका खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर ३ टक्के कमिशन देण्याचेही प्रलोभन अग्रवाल यांना दिले होते. त्यामुळे अग्रवाल यांनी विविध राज्यातील ठिकठिकाणच्या व्यावसायिकांकडून पाच कोटींचा मका तसेच अन्य चीजवस्तूची खरेदी केली. हा माल त्यांनी आपल्या गोदामात ठेवली; नंतर तो मका जयस्वालने सांगितलेल्या ठिकाणी वाराणसीत पाठविला. अग्रवाल यांनी ज्यांच्याकडून हा मका खरेदी केला त्या सर्व व्यापाऱ्यांना विशिष्ट मुदतीनंतर त्यांची रक्कम परत केली. मात्र, जयस्वालने अग्रवाल यांना पाच कोटींपैकी केवळ अडीच कोटी रुपयेच दिले. अडीच कोटी रुपयांसाठी तो गेल्या सहा महिन्यांपासून अग्रवाल यांना टाळत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आरोपीने जाणीवपूर्वक अग्रवाल यांना नोटीस पाठवून रक्कम अडवून ठेवण्याचीही शक्कल केली. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे अग्रवाल यांनी लकडगंज पोलिसांकडे जयस्वालविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. जयस्वालची चौकशी केली जात आहे.