कोरोना होण्यापूर्वी ६३ टक्के रुग्णांना होती झोपेची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:53+5:302021-03-21T04:08:53+5:30
नागपूर : झोप ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. परंतु पुरेशी झोप न झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कुमकुवत होते. ...
नागपूर : झोप ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. परंतु पुरेशी झोप न झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कुमकुवत होते. परिणामी, कोरोना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात केलेल्या अभ्यासात ही महत्त्वाची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, ६३ टक्के बाधितांना कोरोना होण्यापूर्वी झोपेची समस्या होती.
आयुष्यातील ४० टक्के वेळ हा ‘बेडरूम’मध्ये घालवला जातो. परंतु त्यानंतरही झोपेचे महत्त्व अनेकांना नाही. यामुळेच जगात ४५ टक्के लोक झोपेशी जुळलेल्या रोगाशी सामान करीत आहेत. अनिद्रा रोगाच्या वैद्यकीय, सामाजिक, भावनात्मक आणि शैक्षणिक कारणांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉ. मेश्राम म्हणाले. झोप व कोरोनावरील अभ्यासाबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, श्वसनरोग विभागात कोरोना बाधितांवर अभ्यास करण्यात आला. यात ६३ टक्के बाधितांना कोरोना होण्यापूर्वी झोपेची समस्या असल्याचे दिसून आले. ही एक मोठी संख्या आहे. विशेष म्हणजे, यातील अनेकांचे सीटी स्कॅन केल्यावर त्यांचा ‘एचआरसीटी स्कोअर’ १६ टक्क्यांहून जास्त होता. हे गंभीर आहे.
-अभ्यासातून ही धक्कादायक माहिती आली समोर
:: कोरोना होण्यापूर्वी ६३ टक्के लोकांना झोपेची समस्या होती तर, ३७ टक्के लोकांना ही समस्या नव्हती. इतर निरोगी लोकांमध्ये चांगल्या झोपेचे प्रमाण ७३ टक्के असते.
:: कोरोना होण्यापूर्वी २० टक्के रुग्णांना निद्रानाशाची समस्या होती. सामान्य लोकांमध्ये याचे प्रमाण १० टक्के राहते.
:: ‘इफेक्टिव्ह’ झोपेचे प्रमाण निरोगी लोकांमध्ये ९८ टक्के असते, तर कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये ६४ टक्केच होते.
:: निरोगी राहण्यासाठी कमीतकमी सात तासांची झोप आवश्यक असते. ५७ टक्केच कोरोनाबाधित सात तासांची झोप घेत होते, तर ४३ टक्के लोक सात तासांपेक्षा कमी झोप घेत होते. सामान्य लोकांमध्ये सात तास झोपण्याचे प्रमाण ७० टक्के आहे.
::कोरोना होण्यापूर्वी ८४ टक्के लोकांना रात्री झोपेत अडथळे येत होते. निरोगी लोकांमध्ये ही समस्या ३४ टक्के असते.
:: कोरोना होण्यापूर्वी २३ टक्के लोक झोपेचे औषध घेत होते. सामान्य लोकांमध्ये याचे प्रमाण ०.५ टक्के आहे.
:: कोरोना होण्यापूर्वी ४६ टक्के लोकांना झोपेच्या आजाराची दिवसा आढळून येणारी लक्षणे उदा. थकवा जाणवणे, झोप येणे आदी दिसून येत होती. सामान्य लोकांमध्ये याचे प्रमाण तीन टक्के असते.