कोरोनामुळे कोषागार कार्यालयात अभ्यागतांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:00+5:302021-04-06T04:07:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर व जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा कोषागार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर व जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयात अभ्यागतांना बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच निवृत्तिवेतनधारकांची ओळख तपासणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे.
जिल्हा कोषागार कार्यालय हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या कार्यालयातील तब्बल १९ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच एका कर्मचाऱ्याचा मृत्यूही झााला. त्यामुळे उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्हा कोषागार कार्यालयात ७ एप्रिल ते १५ एप्रिल २०२१ या दरम्यान ३५० निवृत्तिवेतनधारकांना प्रथम ओळख तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु कोरोनाचे संक्रमण व कार्यालयातील परिस्थिती लक्षात घेता प्रस्तावित ओळख तपासणीची प्रक्रिया महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. ही प्रक्रिया आता मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, तर मे महिन्यात बोलावण्यात आलेल्यांना जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बोलावण्यात येईल, तरी निवृत्तिवेतनधारकांनी या महिन्यात कार्यालयात येऊ नये, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी गजानन हिरूळकर यांनी सांगितले आहे.