CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा ब्लास्ट : एकाच दिवशी ४४ रुग्ण व तिसरा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 11:57 PM2020-05-06T23:57:54+5:302020-05-07T00:05:06+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी ४४ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. नागपुरात रुग्णांची संख्या आता २०६ वर पोहचली आहे. यातच २२ वर्षीय मृताचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने तिसऱ्या मृत्यूची नोंदही झाली आहे.

Corona blast in Nagpur: 44 patients and third death on the same day | CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा ब्लास्ट : एकाच दिवशी ४४ रुग्ण व तिसरा मृत्यू

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा ब्लास्ट : एकाच दिवशी ४४ रुग्ण व तिसरा मृत्यू

Next
ठळक मुद्देरुग्णसंख्या २०६ : मृत युवक पार्वतीनगरातील : नऊ महिन्याची गर्भवती, एक डॉक्टरही पॉझिटिव्ह






लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी ४४ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. नागपुरात रुग्णांची संख्या आता २०६ वर पोहचली आहे. यातच २२ वर्षीय मृताचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने तिसऱ्या मृत्यूची नोंदही झाली आहे. नागपुरात हा कोरोनाचा ‘ब्लास्ट’ असल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक म्हणजे, एक मृत आणि तीन रुग्ण हे ‘रेड झोन’बाहेरील वसाहतीतील म्हणजे पार्वतीनगर, मोठा ताजबाग, जरीपटका व गणेशपेठ या नव्या वसाहतीतील आहेत. यामुळे येत्या काळात रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपुरात पहिल्या कोरोनाबाधिताची नोंद ११ मार्च रोजी झाली. या महिन्यात केवळ १६ रुग्णाची नोंद होती. एप्रिल महिन्यात १२२ तर मे महिन्यातील ६ तारखेपर्यंत ६८ रुग्णांचे निदान झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यापर्यंत १० च्या आत असलेली रुग्णसंख्या अचानक ४४ वर पोहचल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. आज मेयोच्या प्रयोगशाळेत आठ नमुने पॉझिटिव्ह आले. यात ९, १८,२२, २७, ३५ वर्षीय पुरुष तर २१, ३९ व ४० वर्षीय महिला आहे. यातील ३९ वर्षीय महिला ही नऊ महिन्याची गर्भवती असून ती सतरंजीपुरा रहिवासी आहे, तर उर्वरित सातही रुग्ण मोमिनपुऱ्यातील आहेत. मेडिकलच्या प्रयोगशाळेतून मोमिनपुºयातीलच ५६ वर्षीय पुरुषाचा व पार्वतीनगर येथील २२ वर्षीय मृताचा नमुना पॉझिटिव्ह आला. नीरीच्या प्रयोगशाळेतून तब्बल १६ नमुने पॉझिटिव्ह आले. यात २५ व ३८ वर्षीय महिला, १७, १२, २३, ४५, १८, १३, २५, १९, १७, ४३, ३७, ३७, १४ व २३ वर्षीय पुरुष आहे. हे सर्व मोमिनपुऱ्यातील रहिवासी आहेत. संशयित म्हणून संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल होते. ‘माफसू’ प्रयोगशाळेतून नऊ नमुने तर एम्समधून नऊ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. या दोन्ही प्रयोशाळेतील नमुन्यांची विस्तृत माहिती मिळाली नाही. आज एकूण ४४ नमुने पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात रुग्णांची संख्या २०६ वर गेली आहे. यातील मृत सोडल्यास सर्व रुग्ण क्वांरटाईन होते, असे सांगण्यात येते.

कानाचे दुखणे घेऊन मृत मेडिकलमध्ये आला होता
प्राप्त माहितीनुसार, रामेश्वरीतील पार्वतीनगर येथील २२ वर्षीय युवक मंगळवारी मेडिकलच्या अपघात विभागात दाखल झाला. त्याचा कान दुखत असल्याने तो उपचारासाठी आला होता. हा ‘स्किझोफ्रेनिया’नेही ग्रस्त होता. त्याला झटके येत असल्याने उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यापासून ताप, सर्दी व खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची लक्षणे होती. डॉक्टरांनी त्याची माहिती घेतल्यावर कोरोना संशयित म्हणून नोंद घेतली. याचवेळी त्याला श्वास घेणे कठीण झाले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या घशातील स्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दक्षिण नागपुरातील पहिल्या मृत रुग्णाची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेने ही संपूर्ण वसाहत सील केली आहे.

मोमिनपुऱ्यातील एका हॉस्पिटलमधून संपर्क झाल्याची माहिती
प्राप्त माहितीनुसार, मोमिनपुरा भगवाघर चौक येथे एक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये मोमिनपुºयातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. या हॉस्पिटलमध्ये मृत युवकाची मावशी नर्स म्हणून काम करते. ही मावशी आणि मृत एकाच घरात राहात असल्याचीही माहिती आहे. तेथून तर हा रुग्ण कोरोनाच्या संपर्कात आला नसावा, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मनपाच्या आरोग्य पथकाने कुटुंबातील सर्व लोकांना क्वारंटाईन केल्याने लवकरच सत्य काय ते समोर येणार आहे.

पार्वतीनगर, मोठा ताजबाग, गणेशपेठ, जरीपटका ‘हॉटस्पॉट’ उंबरठ्यावर
आज तपासण्यात आलेल्या नमुन्यामध्ये ४४ नमुने पॉझिटिव्ह आले. यात ३३ नमुने एकट्या मोमिनपुºयातील आहेत, तर सात नमुने
सतरंजीपुऱ्यातील आहेत. उर्वरित एक नमुना गणेशपेठ, एक जरीपटका, एक मोठा ताजबाग येथील रुग्णाचा तर एक पार्वतीनगर येथील मृताचा आहे. मोठा ताजबागमधील महिला रुग्ण ही डॉक्टर आहे. चार नव्या वसाहतीत कोरोनाबाधित व एक मृत आढळल्याने या वसाहती ‘हॉटस्पॉट’च्या उंबरठ्यावर आहेत.

नीरीच्या प्रयोगशाळेत १६ नमुने पॉझिटिव्ह
मेयोच्या प्रयोगशाळेत आठ, मेडिकलच्या प्रयोगशाळेत दोन (एक मृत), नीरीच्या प्रयोगशाळेत १६, माफसूच्या प्रयोशाळेत नऊ तर एम्सच्या प्रयोगशाळेत नऊ असे एकूण ४४ नमुने पॉझिटिव्ह आले.

पाच वर्षीय चिमुकल्यासह दोघांची कोरोनावर मात
शांतिनगर येथील रहिवासी असलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याने कोरोनावर मात केली. या मुलाच्या नमुन्याचा अहवाल २२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला होता. औषधोपचाराला प्रतिसाद दिल्याने १४ व्या दिवशी त्याचा नमुना निगेटिव्ह आला. त्याला आज मेडिकलमधून सुटी देण्यात आली. याशिवाय, टिमकी येथील ३८ वर्षीय पुरुषही मेयो येथून कोरोनामुक्त झाला. या रुग्णाचा नमुना २१ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला होता. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६३ झाली आहे.
 

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ३३
दैनिक तपासणी नमुने १७९
दैनिक निगेटिव्ह नमुने १७०
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने २०६
नागपुरातील मृत्यू ०३
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ६३
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १५५८
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १९५५
पीडित - २०६ - दुरुस्त - ६३ - मृत्यू -३

Web Title: Corona blast in Nagpur: 44 patients and third death on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.