कोरोनामुळे लोक झालेत शाकाहारी : नागपुरात डाळींची विक्री ३० टक्के वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 11:29 PM2020-04-01T23:29:32+5:302020-04-01T23:30:53+5:30
कोरोना व्हायरसच्या भीतीने देशात जवळपास ५० टक्के लोकांनी मांसाहाराचा त्याग केल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी डाळींचे सेवन सुरू केल्याने विविध प्रकारच्या डाळींची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसच्या भीतीने देशात जवळपास ५० टक्के लोकांनी मांसाहाराचा त्याग केल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी डाळींचे सेवन सुरू केल्याने विविध प्रकारच्या डाळींची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे. तूर आणि चणा डाळीला जास्त मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
होलसेल धान्य असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, सध्या तूर डाळीसह अन्य डाळीची जास्त प्रमाणात विक्री होत आहे. ग्राहकांकडून दररोज मागणी वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात डाळींचे उत्पादन २४० ते २५० लाख टन होते. त्यातुलनेत विक्रीही अंदाजे २५० लाख टन आहे. डाळींचे उत्पादन वाढल्याने अनेक डाळी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावात विकत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत होते. त्यामुळे सरकारने डाळींच्या आयातीवर मात्रात्मक निर्बंध लावण्याचे आदेश जारी केले होते. विदेशातून चणा, तूर, मूग, उडद, वाटाणा, मसूर, काबुली चणा, हिरवा वाटाणा आयात होते. आता मात्रात्मक आयातीचे निर्बंध हटविले आहेत. याशिवाय बंद असलेली निर्यात सुरू झाली आहे. पण सरकारने अनेक डाळींवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावले आहे. तसेच सरकारनेही मोठ्या प्रमाणात सरकारी एजन्सीच्या माध्यमातून देश-विदेशातून डाळींची खरेदी सुरू केली आहे. त्यानंतरही देशात डाळींचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी राहिले.
मोटवानी म्हणाले, मार्चच्या सुरुवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने देशात सुरक्षेच्या दृष्टीने २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आणि लोकांना बचावासाठी जागरूकता अभियान सुरू केले. लोकांनी मांसाहार त्यागून शाकाहाराचा अवलंब सुरू केला. त्यामुळेच सर्व प्रकारच्या डाळींच्या विक्रीत ३० टक्के वाढ झाली. लॉकडाऊननंतर देशात गतवर्षीच्या याच काळात २१ लाख टनाच्या तुलनेत २६ लाख टन डाळींची विक्री झाली. देशात डाळींची कुठलीही कमतरता नाही. त्यामुळे नागरिकांनी अपेक्षेपेक्षा जास्त डाळींची खरेदी करू नये. सरकारकडे ४३५ लाख टन खाद्यान्नांचा साठा आहे. त्यामध्ये २७२.१९ लाख टन तांदूळ, १६२.७९ लाख टन गहू आणि ३७ लाख टन डाळींचा साठा आहे. या साठ्यातून सरकार १ एप्रिलपासून ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू आणि एक किलो तूर डाळ रेशन दुकानातून दरमहा देत आहे. त्यामुळे गरिबांची गरज पूर्ण होणार आहे.
सध्या देशात डाळींचा पुरेशा साठा आहे. पण वाहतूक व्यवस्था बंद असल्याने माल होलसेलमधून किरकोळमध्ये मिळत नाही. त्यामुळे भाव वाढले आहेत. सध्या कच्चा माल नसल्याने फिनिश मालाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पण लॉकडाऊन समाप्त झाल्यानंतर भाव पुन्हा कमी होणार आहे. मोटवानी म्हणाले, मांसाहाराच्या तुलनेत एक कुटुंब एक किलो डाळीचा उपयोग अनेक दिवस करू शकतो. डाळींमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. देशात डाळींची विक्री वाढण्याचे संकेत चांगले आहेत. त्यामुळे पिकाला चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. देशात डाळीच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल.