नागपूर शहर पोलिसात कोरोनाची चाहूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 09:41 PM2020-05-06T21:41:03+5:302020-05-06T22:03:03+5:30
फुटबॉल खेळाडूच्या मृत्यूने शहर पोलिसातही कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाहूल दिसून येत आहे. मृत युवकाचा काका हा बेलतरोडी पोलीस ठाण्यात तैनात आहे. ठाण्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुटबॉल खेळाडूच्या मृत्यूने शहर पोलिसातही कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाहूल दिसून येत आहे. मृत युवकाचा काका हा बेलतरोडी पोलीस ठाण्यात तैनात आहे. ठाण्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
मृताचा काका बेलतरोडी ठाण्यात नायक शिपाई आहे. त्याने युवकाला रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली होती. यामुळे त्याला आणि कुटुंबाला कोरोना संसर्ग झाल्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काकाशी संबंधित बेलतरोडी ठाण्यातील एक अधिकारी आणि सहा कर्मचाऱ्यांनासुद्धा तात्काळ एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. ठाणेदार विजय आकोत यांनी डॉक्टरांच्या पथकाला बेलतरोडी ठाण्यात बोलावले. ठाणे परिसराला सॅनिटाईझ करून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला. बेलतरोडी ठाण्यात ७ अधिकारी आणि ८८ कर्मचारी आहेत. पोलीस आपला जीव धोक्यात घालून कोरोना योद्धाची भूमिका निभावत आहे. या घटनेने त्यांचे कुटुंबीय प्रचंड चिंतित आहेत.
मृत युवक फुटबॉल खेळाडूसोबतच तो ‘स्किझोफ्रेनिया’ने ग्रस्त होता. हा एकप्रकारचा मानसिक आजार आहे. त्याच्यावर उपचारही सुरू होते. वडील तुरुंगात असल्याने आई लोकांच्या घरी भोजन बनवण्याचे काम करते. ती नेहमी कामात व्यस्त राहते. बेरोजगार असल्याने युवकही दिवसभर परिसरात फिरत राहत होता. यामुळे मागील काही दिवसात तो अनेकांच्या संपर्कातही आला. पार्वतीनगर दाट लोकवस्तीचा परिसर आहे. युवक व त्याच्या कुटुंबीयांशी संबधित वस्ती ‘डेंजर झोन’मध्ये आली आहे. पोलीस आणि प्रशासन युवक व त्याच्या आईच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करीत आहे.
युवक हा अजनी पोलीस ठाणे परिसरातच फिरत राहायचा. त्यामुळे त्याला परिसरातील व्यक्तीकडूनच संसर्ग झाल्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या वस्तीतील काही लोकांचे मध्य आणि पूर्व नागपूरशी संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोना झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु त्या लोकांचा खुलासा न झाल्याने पार्वतीनगरात कोरोनाची पुष्टी होऊ शकलेली नाही. काही नावे समोर आली असून, त्याची चौकशी करून खरा प्रकार जाणून घेण्यात येत आहे.
पोलीस विभागाने घेतली गंभीर दखल - पोलीस आयुक्त
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, कोरोनापासून वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व केले जात आहे. सध्याच्या घटनेला अतिशय गांभीर्याने घेण्यात आले आहे. मृताच्या काकाशी थेट संबंधित लोकांना क्वारंटाईन करून इतरांवर लक्ष ठेवले जात आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी पोलिसांना मास्क, हॅण्ड सॅनिटायजर, फिजिकल डिस्टन्सिंगसह सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेसह भोजन आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचवण्याची सामाजिक जबाबदारीसुद्धा आहे. यावर खरे उतरण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे.