मुख्य आयकर आयुक्तांना कोरोना : आयकर भवन परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 08:20 PM2020-07-15T20:20:45+5:302020-07-15T20:30:17+5:30
नागपूर विभागाच्या मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांना २४ जुलैपर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय सिव्हिल लाईन्स येथील आयकर परिसर १७ जुलैपर्यंत सील करण्यात आला .
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागाच्या मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांना २४ जुलैपर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय सिव्हिल लाईन्स येथील आयकर परिसर १७ जुलैपर्यंत सील करण्यात आला असून सॅनिटाईझ करण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना होम क्वारंटाईन न करता प्रशासनाच्या सेंटरमध्ये पाठविण्यात येते, मग अधिकाऱ्यांना का नाही, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
मुख्य आयकर आयुक्त या उपचारासाठी मुंबईला गेल्या होत्या. नागपुरात परत आल्यानंतर त्यांनी १० जुलैला आयकर भवनात बैठक घेतली. बैठकीत तीन मुख्य आयकर आयुक्त, दोन अतिरिक्त आयकर आयुक्त, दोन सहआयुक्त, तीन सहायक आयकर अधिकाऱ्यांसह इतर आयकर अधिकारी उपस्थित होते. हे अधिकारी त्यांच्या संपर्कात आल्याने सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांची कोरोना टेस्ट होणार आहे. याशिवाय कार्यालयीन कामासाठी २२ सीएंनी त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. हे सीए कोण, याची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी घेत आहेत.
विमानाने आल्यानंतर अधिकारी क्वारंटाईन का नाही?
विभागाचे वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त मुंबई, पुणे, दिल्लीला विमानाने जाऊन परत कार्यालयात येतात. सामान्य नागरिक विमानाने नागपुरात आले तर त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का लावून त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात येतो. कायदा समान असताना अधिकाऱ्यांना वेगळा न्याय कसा, त्यांनाही होम क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय आयकर एससी/एसटी वेलफेअर असोसिएशनच्या नागपूर विभागाचे सचिव किशोर जाधव यांनी केली आहे. बरेच अधिकारी कामानिमित्त मुंबई, पुणे आणि दिल्लीला विमानाने अपडाऊन करतात. हॉटस्पॉट शहरातून परत नागपुरात आल्यानंतर त्यांनी क्वारंटाईन व्हावे. त्यांनी स्वत:ही सुरक्षित राहावे आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही सुरक्षित ठेवावे, असे त्यांनी सांगितले.