झाडीपट्टी रंगभूमीवर पुन्हा कोरोनाचे संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:55 AM2020-11-22T09:55:45+5:302020-11-22T09:58:54+5:30
Corona Nagpur News दिवाळीनंतर उसळलेली कोरोना संसर्गाची दुसरी लाट झाडीपट्टी रंगभूमीच्या आनंदावर पुन्हा विरजण घालत आहे. एक तर नाटकांचे बुकिंग होत नाही आणि जी मंडळे नाटके आयोजित करत आहेत, तिथे कुठलेच नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कठोर मार्गदर्शिकेसह सांस्कृतिक कार्यक्रमांना मुभा देण्यात आल्यानंतर झाडीपट्टी रंगभूमीवर पुन्हा वर्दळ सुरू झाली आहे. मात्र, दिवाळीनंतर उसळलेली कोरोना संसर्गाची दुसरी लाट त्या आनंदावर पुन्हा विरजण घालत आहे. एक तर नाटकांचे बुकिंग होत नाही आणि जी मंडळे नाटके आयोजित करत आहेत, तिथे कुठलेच नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचाच परिणाम झाडीपट्टीतील आरोग्य केंद्रांनी संबंधित मंडळांना खबरदारीचा इशारा देणारे पत्र जारी केले आहे.
कोरोना आणि टाळेबंदीमुळे यंदा झाडीपट्टी रंगभूमीचा सिझन सुरू होणार नाही, अशी भीती असतानाच ५ नोव्हेंबरपासून राज्य शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना ढिल दिली. त्याअनुषंगाने नाट्यसंस्थांनी भाऊबीजेच्या मुहूर्ताची तयारी सुरू केली. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक अतिशय सजग असल्याने तेथील मंडळांनी नाटकांचे बुकिंग घेण्यास सध्या तरी नकार दर्शवला आहे. त्यामुळे, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या निर्मात्यांना बुकिंग नसल्याचा फटका बसत आहे. त्यांची गुंतवणूक पाण्यात जाईल, अशी त्यांना भीती वाटत आहे. मात्र, जिथे कुठे बुकिंग मिळत आहे. तेथे कोरोना संदर्भातले सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. नाटकाला २०० प्रेक्षकांच्या वर परवानगी नसताना दोन हजारावर प्रेक्षक हजेरी लावत आहेत आणि ९५ टक्के लोक मास्क घालत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम संबंधित तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कठोर भूमिका घेण्यास सज्ज झाले आहेत. अशाच एका प्रकरणात १७ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील खोडशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित सर्व ग्रामपंचायतींना निर्वाणीचा इशारा देणारे पत्र जारी केले आहे. जमावबंदी टाळण्याचे आवाहन करताना इतरांचा जीव धोक्यात घालण्याच्या कारणाने आयोजकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आयोजकांना तोटा सहन करायचा नाही
नाट्य सादरीकरणाच्या वेळी प्रेक्षकांसाठी सहा फूट अंतरावर एक खुर्ची असा नियम आहे. एका अर्थाने २५-३० टक्केच प्रेक्षकांना नाटक बघण्याची मुभा आहे. या नियमामुळे तिकीट खिडकीवरील उत्पन्न घसरणार असल्याने आयोजक मंडळे तोटा सहन करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे, बरीच मंडळे नाटकाचे प्रयोग घेण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र, काही ठिकाणी कोरोना संबंधातील सर्वच नियमांना तिलांजली दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
धोका असाही अन् तसाही!
झाडीपट्टी रंगभूमी ही कलावंतांसोबतच अनेकांची प्रमुख उपजीविका आहे. त्यामुळे, नाटक झाले नाही तर तसेही मरण आहेच आणि नाटक झाले तर कोरोना संसर्गाचा धोका आहे, अशी भावना कलावंत व्यक्त करत आहेत. या विषयावर सध्या कुणीच बोलण्यास तयार नाहीत, हे विशेष. मात्र, बरेच कलावंत हे नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, मुंबई, पुणे या अत्याधिक कोरोना बाधित शहरांतून येत असल्याने आणि सद्यस्थितीचा अंदाज घेता झाडीपट्टी रंगभूमीवर धोका निर्माण झाला आहे.