पाच महिन्यानंतर नागपुरात कोरोना मृत्यूची नोंद; ७९९ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 09:48 PM2022-01-11T21:48:54+5:302022-01-11T21:49:17+5:30
Nagpur News मंगळवारी नागपुरात कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली. पाच महिन्यानंतर झालेल्या या मृत्यूने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविली आहे.
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सलग पाच दिवसापासून दररोज ७०० वर रुग्णांची नोंद होत असताना मंगळवारी कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली. पाच महिन्यानंतर शहरात झालेल्या या मृत्यूने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविली आहे. मृतांची एकूण संख्या १०,१२४ झाली तर, आज ७९९ नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या ४,९९,३५८ वर पोहचली.
मृत व्यक्ती ४६ वर्षीय महाल तुळशीबाग येथील रहिवासी होता. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री घरीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना सक्करदरा चौकातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच दुसरा झटका आला. तेथून त्यांना तातडीने मेडिकलमध्ये नेण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. नियमानुसार, मेडिकलच्या शवविच्छेदनगृहात मृतदेहाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. मंगळवारी कोविड पॉझिटिव्ह अहवाल आला. त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यातच त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता.
- शहरात ६६२ तर, ग्रामीणमध्ये ९६ रुग्ण
नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा चाचण्यांचा वेग वाढला आहे. १२ जूननंतर पहिल्यांदाच चाचण्यांच्या संख्येने ११ हजाराचा टप्पा ओलांडला. मंगळवारी झालेल्या ११,६०० चाचण्यातून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे प्रमाण ६.९ टक्के आहे. शहरात झालेल्या ७,८७८ चाचण्यांमधून ६६२ तर ग्रामीणमध्ये झालेल्या ३,७२२ चाचण्यांमधून ९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात जिल्हाबाहेरील ४१ बाधित आहेत. आज २३२ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४,७२४ वर गेली.
-या वर्षातील दुसरा मृत्यू
१२ ऑगस्टनंतर आज शहरात मृत्यूची नोंद झाली. या पाच महिन्यात झालेल्या सहा मृत्यूमध्ये शहर व ग्रामीण भागातील एकेक असून, जिल्हाबाहेरील चार आहेत. विशेष म्हणजे, डिसेंबर महिन्यात एकाही मृत्यूची नोंद नव्हती. तर या वर्षात दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली.