वेदना कोरोनाच्या : नागपुरात कोरोनाने हिरावले ४७६ बालकांचे आई-बाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 08:18 PM2021-06-02T20:18:36+5:302021-06-02T20:19:10+5:30
Corona effect
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली आहेत. या लाटेत तरुणांचेही जीव गेले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत २२५०च्या वर मृत्यू झाले आहेत. कोरोनाने जिल्ह्यातील ४७० बालकांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या बालकांचे कोरोनामुळे आई अथवा वडील गेले आहेत; तर ६ बालकांचे आई-वडील दोघेही देवाघरी गेले आहेत.
घरातील कर्ता पुरुष, स्त्री यांचा मृत्यू कोरोनाने झाला. जीव गमावलेल्यांपैकी अनेकांची मुले १८ वर्षांखालील आहेत. आई-वडिलांपैकी कुणी एक असेल तर त्यांना थोडाफार आधार तरी आहे; पण ज्या बालकांनी आई-वडील दोघेही गमावले, त्यांचे संगोपन व संरक्षणाचा प्रश्न आहे. बालकांच्या या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने सु-मोटो याचिका दाखल करून घेतली. न्यायालयाने सरकारला काही निर्देश दिले. न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने जिल्हास्तरावर कृती दल स्थापन करण्याचे निर्देश दिले. यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व ग्रामीणचे अधीक्षक, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचा समावेश केला. जिल्हाधिकारी या कृती दलाचे अध्यक्ष असून, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक आहेत. प्रत्येक सदस्याला त्याचे कर्तव्य व जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
कृती दल काय करणार
१) ज्या मुलांचे दोन्ही पालक कोरोनाने हिरावले, अशा बालकांना बालगृहात ठेवले जाणार.
२) मुलांच्या संगोपनासह शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाकडून उचलली जाणार.
३) बालगृहात ठेवलेल्या मुलांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाणार.
४) मुलांची जबाबदारी बाल संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपविली जाणार.
५) या बालकांचे आर्थिक व मालमत्ताविषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेतली जाणार.
जिल्ह्यात निराधार झालेले बालके
आईला गमावलेले - ८७
वडिलांना गमावलेले - ३८३
दोघांनाही गमावलेले - ६