कोरोनामुळे ‘महाज्योती’साठी काम करण्यास वेळच मिळाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:07 AM2021-06-01T04:07:10+5:302021-06-01T04:07:10+5:30

नागपूर : ऑगस्ट २०२० मध्ये ‘महाज्योती’च्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. याच महिन्यात संचालकांची निवड झाली. दोन महिने पदभरतीत गेले. ...

Corona didn't have time to work for 'Mahajyoti' | कोरोनामुळे ‘महाज्योती’साठी काम करण्यास वेळच मिळाला नाही

कोरोनामुळे ‘महाज्योती’साठी काम करण्यास वेळच मिळाला नाही

Next

नागपूर : ऑगस्ट २०२० मध्ये ‘महाज्योती’च्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. याच महिन्यात संचालकांची निवड झाली. दोन महिने पदभरतीत गेले. डिसेंबरला कामाला सुरुवातच केली असताना कोरोना वाढला, लॉकडाऊन लागले. त्यामुळे महाज्योतीसाठी काम करण्यास वेळ मिळाला नाही. संचालकांच्या बैठकी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे योजना राबविता आल्या नाहीत, प्रशिक्षण घेता आले नाही, परिणामी निधीही खर्च झाला नाही, अशी खंत महाज्योतीचे अध्यक्ष व मदत व पुनर्वसन आणि बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

महाज्योतीच्या संचालक मंडळाची तिसरी बैठक सोमवारी सामाजिक न्याय भवनात पार पडली. या बैठकीला वडेट्टीवार उपस्थित होते. बैठकीत प्राचार्य बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे व लक्ष्मण वडले यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत त्यांनी महाज्योतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास योजनेत ४० हजार युवकांना लाभ देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

३५ कोटीच मिळाले महाज्योतीला

महाज्योतीला आतापर्यंत ३५ कोटी मिळाले आहेत. १५० कोटी रुपयांची तरतूद केली असून, अजूनही निधी मिळाला नाही. ३५ कोटींपैकी ३.५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मिळालेला निधी परत जाणार नाही, तो योग्यवेळी खर्च होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

२० विद्यार्थ्यांना बनविणार वैमानिक

महाज्योतीने २० विद्यार्थ्यांना वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी फ्लाईंग क्लबला २.५ कोटी दिले आहेत. विभागीय आयुक्तांना त्याची जबाबदारी दिली आहे. या २० विद्यार्थ्यांमध्ये २ विद्यार्थी शहिदाच्या कुटुंबातील, २ विद्यार्थी शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील, व्हीजेएनटीच्या ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

१) पीएच.डी.ची फेलोशिप ५०० विद्यार्थ्यांना देणार, २०१७ पासून नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करणार. ५ वर्षांसाठी २१ हजार रुपये विद्यावेतन देणार.

२) एमफीलसाठी २०० विद्यार्थ्यांची निवड.

३) बँकिंग परीक्षेसाठी प्रशिक्षण.

४) भटक्या जातींच्या संशोधनासाठी दिल्लीच्या संस्थेला काम देणार.

५) युपीएससीसाठी १००० व एमपीएससीसाठी २००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण.

६) कौशल्य विकास योजनेचा लाभ ४० हजार विद्यार्थ्यांना देणार.

७) पोलीस भरतीपूर्वी प्रशिक्षण व उच्च शिक्षणासाठी प्रवेश पूर्व परीक्षेच्या कोचिंगचे टार्गेट पूर्ण करणार.

८) शाळा, महाविद्यालयात महाज्योतीच्या योजनांचे फलक लावणार.

९) प्रत्येक जिल्ह्यात चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करणार.

१०) शेतकऱ्यांसाठी तेल बियाण्यांचे क्लस्टर तयार करणार.

Web Title: Corona didn't have time to work for 'Mahajyoti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.