कोरोना पुन्हा दारात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:11 AM2021-09-07T04:11:24+5:302021-09-07T04:11:24+5:30
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट मे महिन्यापासून ओसरायला सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या सरासरी १० च्या आत होती. ...
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट मे महिन्यापासून ओसरायला सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या सरासरी १० च्या आत होती. परंतु मागील तीन दिवसापासून विशेषत: शहरात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. सोमवारी नागपूर जिल्ह्यात १२ रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ४,९३,०७१ तर मृतांची संख्या ६ दिवसापासून १०,११९ वर स्थिर आहे.
नागपूर जिल्ह्यात ३ सप्टेंबर रोजी एका रुग्णाची नोंद झाली होती. हा रुग्ण शहरातील होता. ४ सप्टेंबर रोजी सात व ५ सप्टेंबर रोजी नोंद झालेले दहा रुग्ण शहरातील होते. आज आढळून आलेल्या रुग्णांपैकी शहरातील सात, ग्रामीणमधील एक तर जिल्हाबाहेरील चार रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, आज चाचण्यांच्या संख्येत निम्म्याने घट झाली. २,७८७ चाचण्या झाल्या. यात शहरातील २,५१९ तर ग्रामीणमधील २६८ चाचण्या होत्या. त्यातुलनेत जिल्ह्यात पॉझिटिव्हिटीचा दर ०.४३ टक्के होता. समाधानकारक बाब म्हणजे, सहा दिवसापासून मृत्यू नाही. रुग्णसंख्येच्या तुलनेत आज कमी रुग्ण बरे झाले. तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ४,८२,८९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
- पुन्हा एक डॉक्टर बाधित
रविवारी खासगी इस्पितळातील दोन डॉक्टर पॉझिटिव्ह आले असताना, सोमवारी आणखी एक डॉक्टर बाधित झाले. ते आरोग्य विभागात कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा १६ वर्षांचा मुलगाही पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरवर एम्समध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
- कुटुंबात पसरतोय कोरोना
मागील दोन दिवसातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती पाहता, कुटुंबात कोरोना पसरत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी नरेंद्रनगर येथील एकाच कुटुंबातील तीन सदस्य पॉझिटिव्ह आले असताना, आज पुन्हा याच कुटुंबातील एक सदस्य बाधित असल्याची नोंद झाली. नरेंद्रनगरमधीलच बापलेक पॉझिटिव्ह आले. सिव्हील लाईन्समधील एकाच कुटुंबातील दोन दिवसात दोन तर, याच वसाहतीतील दुसऱ्या कुटुंबातील दोन सदस्य बाधित झाले आहेत. सुभाषनगर, चंदननगर, धरमपेठ, संत्रा मार्केट या भागातील एक-एक रुग्ण आहेत. महानगरपालिकेने बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत.
:: कोरोनाची सोमवारची स्थिती
दैनिक चाचण्या : २,७८७
शहर : ७ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण : ४,९३,०७२
ए. सक्रिय रुग्ण : ५६
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,८९७
ए. मृत्यू : १०,११९