पहिल्याच दिवशी दिसला ‘कोरोना इफेक्ट’, महाविद्यालयांत तोकडी उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:47 AM2021-02-16T00:47:52+5:302021-02-16T00:49:01+5:30
colleges begin, Corona Effect उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सोमवारपासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होईल, असा अंदाज होता; मात्र विदर्भात ‘कोरोना’ परत डोके वर काढत असल्याने त्याचा प्रभाव दिसून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सोमवारपासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होईल, असा अंदाज होता; मात्र विदर्भात ‘कोरोना’ परत डोके वर काढत असल्याने त्याचा प्रभाव दिसून आला. पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांमध्ये पहिल्याच दिवशी तोकडी उपस्थिती होती. काही महाविद्यालयांत विद्यार्थी आले; मात्र वर्ग झाले नाहीत. तर बऱ्याच ठिकाणी ‘ऑनलाइन’वरच भर देण्यात येत असल्याचे चित्र आहे.
१५ फेब्रुवारीपासून विद्यापीठांमधील विभाग व महाविद्यालयांतील वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परवानगी दिली होती. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद व विद्वत परिषदांच्या निर्णयानुसार परिपत्रक जारी केले. आश्चर्याची बाब म्हणजे ‘कोरोना’ परत वाढण्यास सुरुवात झाली असताना हे परिपत्रक जारी झाले होते. सद्यस्थितीत १०० टक्के प्रवेश न देता ५० टक्के विद्यार्थ्यांना ‘रोटेशन’ पद्धतीने वर्गांमध्ये बोलवावे, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात पहिल्या दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांतील अर्धेदेखील महाविद्यालयांत पोहोचले नव्हते. पदव्युत्तर विभागांमध्येदेखील हेच चित्र होते.
काही महाविद्यालयांत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या ‘इंडक्शन’ व ‘ओरिएंटेशन’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्ष वर्ग झाले नाहीत. ‘कोरोना’चे आकडे पाहता पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याचे चित्र आहे.
‘फर्स्ट इअर’च्या विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास
काही अभियांत्रिकी महाविद्यालयांत तसेच पदव्युत्तर विभागांमध्ये पहिल्या वर्षाचे विद्यार्थी उत्साहाने पोहोचले होते; मात्र एकूणच उपस्थिती कमी असल्याने वर्ग घेण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पहिल्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भ्रमनिरास झाला.
विद्यार्थ्यांच्या तपासणीवर भर
महाविद्यालयांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटरने विद्यार्थ्यांची तपासणी इत्यादींवर भर देण्यात आला. शिक्षक व कर्मचाऱ्यांना यासंदर्भात अनेक ठिकाणी विशेष प्रशिक्षणदेखील देण्यात आले. काही महाविद्यालयांत तर ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले जावे, यासाठी प्रयोगशाळांमध्ये वर्ग झाले.
नवीन दिशानिर्देश निघणार का?
नागपूर विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी तर दिली आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचे प्रमाण वाढीस लागले आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाकडून नवीन दिशानिर्देश जारी होणार का, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.