कोरोना इफेक्ट; वैफल्यग्रस्तता अन् रोष वाढला; कुणावरही निघतो आहे संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:57 AM2020-06-26T11:57:25+5:302020-06-26T11:57:56+5:30
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अनेकांना वैफल्यग्रस्त केले आहे. त्यामुळे ते छोट्या छोट्या कारणावरून घात आणि आत्मघात करू लागले आहेत. उपराजधानीत घडलेल्या अनेक घटनांवरून त्याची प्रचिती येत आहे.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक महामारीच्या रूपात आलेल्या कोरोनाच्या प्रकोपाचे भयावह सामाजिक दुष्परिणाम सर्वत्र उमटू लागले आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अनेकांना वैफल्यग्रस्त केले आहे. त्यामुळे ते छोट्या छोट्या कारणावरून घात आणि आत्मघात करू लागले आहेत. उपराजधानीत घडलेल्या अनेक घटनांवरून त्याची प्रचिती येत आहे.
पतीने पत्नीला आणि पत्नीने पतीला घरगुती कारणावरून बोलल्यामुळे आत्महत्या केल्याच्या अनेक घटना गेल्या तीन आठवड्यात नागपुरात घडल्या आहेत. या घटनांची पार्श्वभूमी जाणून घेतली असता धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. कोरोनामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या हातचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे लाखो जणांची तीव्र आर्थिक कोंडी होऊ लागली आहे. परिणामी सर्वत्र चिडचीड, वाद वाढले आहेत. भावनिक आगडोंब उसळत असल्याने छोट्या छोट्या कारणावरून कुणी कुणाचा जीव घेत आहे तर कुणी स्वत:चा जीव देत आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून नागपुरात गेल्या तीन महिन्यात ११५ जणांनी आत्महत्या केली. यात नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी आणि सर्वच स्तरातील व्यक्ती, तरुण, तरुणीचा समावेश आहे. यातील ७० आत्महत्येच्या घटना या आर्थिक कोंडी अन् त्यातून आलेल्या नैराश्यामुळे तसेच चिडचिडेपणामुळे झाल्या आहेत. दुसरीकडे किरकोळ कारणावरून एकमेकांची हत्या केल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. कोरोनामुळे जगण्यावर बंधने आली आहेत. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही, मनासारखे खाणे, घेणे बंद झाले आहे. एवढेच नव्हे तर कुठे जाता येत नाही. अर्थात, मोकळेपणाने फिरणेही बंद झाले आहे. या एकूणच प्रकारामुळे अनेकांना प्रचंड नैराश्य आले असून त्यातून आक्रित घडत आहे. खालील काही घटनांवरून त्याची प्रचिती यावी.
नंदनवन परिसरात बुधवारी रात्री अगदीच किरकोळ कारणामुळे आरोपी बंडू टापरेने शेजारच्या आरती नितीन गिरडकर नामक महिलेची भीषण हत्या केली. या आरोपीचा कोणताही गुन्हेगारी अहवाल नाही.
मंगळवारी २३ जूनला धंतोलीत एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याला झोपेत तोंडावर हात पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून दगडाने ठेचून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
स्वत:चे व्यापारी संकुल असलेल्या पारडीतील मेहर नामक व्यापारी बंधूंनी ७ जूनला दारूच्या नशेत गुन्हेगार दुकानासमोरून हटत नसल्याने त्याचा मुडदा पाडला. लकडगंजमध्ये पुरी खायला दिली नाही म्हणून रोजमजुरी करणाऱ्या एकाने दोन मजुरांची हत्या केली.
पत्नी आधीसारखी लक्ष देत नसल्यामुळे ३० मे रोजी पोलीस महिलेच्या पतीने तहसीलमध्ये आत्महत्या केली.
फेसबुकवर चॅटिंग करताना हमरीतुमरीवर आलेल्या दोघांनी ५ जूनला एका तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला.
पुण्यात एमआयटीत शिकणाऱ्या धंतोलीतील एका सुखवस्तू कुटुंबातील आणि घरात लाडकी असलेल्या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली.
आर्थिक कोंडी झाल्याने सदरमध्ये केटरिंग व्यावसायिकाने २१ जूनला आत्महत्या केली.