कोरोना इफेक्ट! पौरोहित्य करणारे आर्थिक संकटाच्या फेऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 06:00 AM2020-04-20T06:00:00+5:302020-04-20T06:00:06+5:30
धार्मिक अनुष्ठानाने घराघरांना देवळांची चमक देणाऱ्या या पौरोहित्य करणाऱ्या वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे पुरोहितवर्गही हवालदिल झालेला आहे.
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरोघरी धार्मिक अनुष्ठानांच्या माध्यमातून भक्तीचे दीप उजळविणारे भिक्षुक लॉकडाऊनमुळे संकटात सापडले आहेत. धार्मिक अनुष्ठानाने घराघरांना देवळांची चमक देणाऱ्या या पौरोहित्य करणाऱ्या वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे पुरोहितवर्गही हवालदिल झालेला आहे.
साधारणत: एकट्या नागपुरात पाच ते सात हजार प्रत्यक्ष पौरोहित्य करणारी मंडळी आहे. पौरोहित्यावरच ही मंडळी आपले संपूर्ण आयुष्य घालवते. मौंज, विवाह, वास्तूशांती, सत्यनारायण पूजनापासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंत प्रत्येकाचे पुरोहित वेगळे आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सगळेच घरातल्या घरात बंद झाले आहेत. सगळे सोहळे, अनुष्ठाने रद्द झाली आहेत. गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती आणि अक्षयतृतीया यासारख्या पौरोहित्यासाठी अत्यंत महत्त्वाचे सण याच लॉकडाऊनमध्ये निघून गेले. या मुहूर्तांवर यज्ञादी अनुष्ठानांचे अत्याधिक महत्त्व असते. एप्रिल, मे आणि जून हे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून विवाहसोहळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. ते सगळे सोहळे रद्द अथवा स्थगित झाले. या सगळ्यांमध्ये पुरोहितवर्ग अत्यंत महत्त्वाचा असतो. एकातºहेने हे सगळे सोहळे, अनुष्ठाने रद्द झाल्याने यातून मिळणाऱ्या दक्षिणा व भिक्षुकीपासून पुरोहितवर्ग वंचित झाला आहे. त्याचा फटका संपूर्ण वर्षभर बसणार असल्याने हा वर्ग चिंतित आहे. पूजाविधी नाही म्हणून दक्षिणा व भिक्षुकी नाही आणि म्हणून संकटाची स्थिती यांच्यावर ओढवल्या गेली आहे.
मुहूर्त गेला तो परत येणार नाही - स्वप्निल लांबडे
: पूजन, विवाह, मौंज, वास्तू असे सोहळे मुहूर्तावर केले जातात आणि म्हणूनच पुरोहितांची गरज भासते. हे मुहूर्त निघून गेल्यावर ते मुहूर्त पुन्हा येणार नाही. त्यामुळे आता न झालेले कार्य पुढे करावे, असेही होणार नाही, शिवाय या सगळ्यांवर पुरोहितवर्ग जगत असतो. काही तर अत्यंत गरीब आहेत. बऱ्याचदा एका मुहूर्ताला १० कामे एकसाथ येत असतात आणि पुढचे १० दिवस काहीच काम नसते. आता तर संपूर्ण महिना उलटून गेला. अशास्थितीत केवळ याच कामावर जगणारा आमचा पुरोहित उपासमारीशी झुंजत असल्याचे स्वप्निल लांबडे गुरुजी यांनी ‘लोकमत’कडे सांगितले.