कोरोना इफेक्ट : रेस्टॉरंट चालकांची स्थिती ‘अर्श से फर्श तक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:31 PM2020-09-29T23:31:52+5:302020-09-29T23:35:37+5:30
फूड सर्व्हिस सेक्टर हे जगातील सर्वात मोठे उलाढालीचे क्षेत्र आहे. कोरोनाच्या काळात या क्षेत्राला प्रचंड घरघर लागली असून, गेल्या सहा महिन्यात या क्षेत्राने ‘अर्श से फर्श तक’ असा प्रवास केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फूड सर्व्हिस सेक्टर हे जगातील सर्वात मोठे उलाढालीचे क्षेत्र आहे. कोरोनाच्या काळात या क्षेत्राला प्रचंड घरघर लागली असून, गेल्या सहा महिन्यात या क्षेत्राने ‘अर्श से फर्श तक’ असा प्रवास केला आहे.
दररोज हजारो-लाखो रुपयांचे काऊंटर असलेले हे सेक्टर अचानक मातीत मिळाल्यासारखे झाले आहे. कोरोनामुळे नागपुरातील लहानापासून ते मोठ्या रेस्टेराँची स्थिती एकसारखीच आहे. शहरात हजारो लहान-मोठे रेस्टेराँ, बार रेस्टेराँ, ढाबे आहेत आणि लॉकडाऊनपूर्वी या सर्व रेस्टेराँची एका दिवसाची उलाढाल शेकडो कोटी रुपयांची होती. टाळेबंदी शिथिल झाल्यावरही ग्राहकी नसल्याने शहरातील ७० टक्के रेस्टेराँ बंद पडले आहेत. ग्राहक नाही, उत्पन्न नाही, जागेचे भाडे देणे थांबले नाही, विजेचे बिल सुरूच होते याचा परिणाम विना उत्पन्न दरमहा लाखो रुपये भाडे कसे द्यावे, असा प्रश्न या रेस्टेराँ, ढाबे मालकांना पडला. त्यामुळे, त्यांनी रेस्टेराँ बंद करून साहित्याची विक्री मिळेल त्या भावात करणे सुरू केले आहे.
वेटर्सही झाले बेरोजगार
उत्पन्नच नाही तर ग्राहकांना सेवा पुरविणारे वेटर्स कसे पोसावे, हा प्रश्न रेस्टेराँ मालकांना पडला. सुरुवातीचे दोन महिने कसेतरी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनाही नोकरीवरून काढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. प्रत्येक रेस्टेराँमध्ये प्रमुख स्वयंपाकी, त्याचा सहकारी आणि इतर सरासरी पाच वेटर्स आज बेरोजगार झाले आहेत. रेस्टेराँ मालक तर स्वत: कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याची स्थिती आहे.
सप्टेंबरमध्ये सुरू, आता नाईलाजाने बंद केले - निपाणे
पडोळे चौकात मागिल वर्षी सप्टेंबरमध्ये जोराशोरात रेस्टेराँ सुरू केले. महिन्याभरानंतर रेस्टेराँमध्ये ग्राहकी वाढली. अचानक १८ मार्च रोजी टाळेबंदीची नोटीस धडकली. टाळेबंदी उठेल आणि रेस्टेराँ सुरू करू, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षा पूर्णत: फोल ठरली. जागेचे भाडे, विजेचे भाडे, नोकरांचा पगार अशक्य झाला आणि अखेर बंद करावे लागले. आता साहित्याची विक्री करून, गुंतवणूक काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची भावना युवा इन्टरप्रेन्योर अभिनव निपाणे यांनी सांगितले.