देवलापारमध्ये कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:13 AM2021-02-18T04:13:03+5:302021-02-18T04:13:03+5:30
देवलापार : रामटेक तालुक्यातील देवलापार या आदिवासीबहुल गावात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. गत तीन दिवसात येथे पाच ...
देवलापार : रामटेक तालुक्यातील देवलापार या आदिवासीबहुल गावात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. गत तीन दिवसात येथे पाच विद्यार्थ्यांसह २५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून परिसरातील शाळा-कॉलेज बंद करण्याची मागणी पालकांनी केली आहे. गतवर्षी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देवलापार येथे बाधितांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. ग्रा.पं. प्रशासन आणि ग्रामस्थांनी गावात विविध उपाययोजना आखत कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखले होते. मात्र अनलॉकनंतर येथे कोविड नियमाचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे येथे दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर करण्याची मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे. आरोग्य विभागामार्फत मंगळवारी देवलापारच्या श्री लक्ष्मीदेवी अग्रवाल कॉन्व्हेंटमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कैलास राऊत, अप्पर तहसीलदार प्रेमकुमार आडे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा भादीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक शिलनकर आणि देवलापारच्या सरपंच शाहिस्ता पठाण उपस्थित होते. तीत गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.