कोरोना पाठोपाठ डेंग्यूच्या रुग्णाचा आलेख वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:53+5:302021-07-16T04:07:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : काेराेना संक्रमणाचा वेग थाेडा कमी हाेताच कुही शहरासह तालुक्यात डेंग्यूने ताेंड वर काढले आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : काेराेना संक्रमणाचा वेग थाेडा कमी हाेताच कुही शहरासह तालुक्यात डेंग्यूने ताेंड वर काढले आहे. शहरासह बहुतांश गावांमध्ये डेंग्यू व विषाणूजन्य तापाचे रुग्ण आढळून येत असल्याची माहिती आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. या आजाराचा प्रसार डासांमुळे हाेत असल्याने त्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने उपाययाेजना कराव्या, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
मार्च, एप्रिल व मे मध्ये काेराेना संक्रमणाचा वेग अधिक हाेता. जूनपासून हा वेग कमी व्हायला सुरुवात झाली. त्यातच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून डेंग्यूने शहरी व ग्रामीण भागात ताेंड वर काढले आहे. प्रत्येक गावातील बहुतांश घरांमध्ये तापाचे रुग्ण आढळून येत असून, यातील काहींना ताप, डोकेदुखी व उलट्या हाेणे ही लक्षणे आढळून आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय, कुही येथील डाॅक्टरांनी दिली.
मांढळ, तितूर व साळवा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या पारडी, सिल्ली, देवळी (कला) व कुजबा या गावांमध्ये आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सर्वेक्षण सुरू केले आहे. साेबतच रुग्णशाेध व जनजागृती माेहीम राबविली जात असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
कुही नगरपंचायत तसेच तालुक्यातील काही ग्रामपंचायत प्रशासनाने शहर व गावांच्या साफसफाईकडे तसेच डास प्रतिबंधक औषधांची धूरळणी करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप देवीदास ठवकर, निखील येळणे यांच्यासह नागरिकांनी केली आहे. दुसरीकडे, साफसफाई माेहीम सुरू करण्यात आली असून, पाण्याचे निर्जंतुकीकरण, धूरळणी, नाल्यांची फवारणी आदी कामे केली जात असल्याची माहिती देवळी (कला)चे प्रशासन सुनील ढेंगे, ग्रामसेवकद्वय शरद दोनोडे व उदय चांदूरकर यांनी दिली.
...
अधिक रुग्णसंख्येची गावे
कुही तालुक्यातील चिपडी येथे काेराेना संक्रमित रुग्णही आढळून आला आहे. तालुक्यातील पारडी येथे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या चार झाली असून, त्याखालाेखाल सिल्ली, देवळी (कला) व कुजबा येथेही रुग्णसंख्येत वाढ हाेताना दिसून येत आहे. यातील काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालय कुही येथे भरती केले असून, काही रुग्णांवर खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. गजबे यांनी दिली.
...
कुहीवासी डासांमुळे हैराण
पारडी येथे लाेकसहभागातून गावाच्या साफसफाईची कामे केली जात असून, जनजागृती केली जात असल्याची माहिती उपसरपंच नरेश शुक्ला यांनी दिली. कुही शहरात डासांची पैदास दिवसागणिक वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याच काळात कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा मुद्दा ऐरणीवर आला. कुही नगर पंचायत प्रशासनाने त्यावर ताेडगा न काढल्याने शहरातील कचरा विल्हेवाट यंत्रणेचे बारा बाजले असून, नाल्यांमध्ये सांडपाणी तुंबले आहे.
...
डबके, नाली, टब, टायर यामधे पाणी साचून राहात असल्याने त्यातील जंतू व डास डेंग्यू व इतर कीटकजन्य राेगाच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. या आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता व साफसफाईला महत्त्व दिले पाहिजे.
- मनोज हिरुडकर,
खंडविकास अधिकारी, कुही.
...
नागरिकांनी भयभीत न होता घर व परिसराची स्वच्छता ठेवावी. डेंग्यू अथवा अन्य आजाराची लक्षणे आढळताच वेळ न गमावता नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन औषधोपचार सुरू करावा.
- डाॅ. संजय निकम,
तालुका आराेग्य आराेग्य अधिकारी, कुही.