आई, वडिलांकडून मुलांमध्ये वाढतोय कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:07 AM2021-04-10T04:07:28+5:302021-04-10T04:07:28+5:30
नागपूर : कोरोनाचे धोका वाढला आहे. घराघरात रुग्ण दिसून येत आहे. विशेषत: आई-वडील किंवा मोठ्यांकडून मुलांमध्ये कोरोना पसरण्याचे प्रमाण ...
नागपूर : कोरोनाचे धोका वाढला आहे. घराघरात रुग्ण दिसून येत आहे. विशेषत: आई-वडील किंवा मोठ्यांकडून मुलांमध्ये कोरोना पसरण्याचे प्रमाण वाढले आहे, परंतु घाबरण्याचे कारण नाही, बहुसंख्य लहान मुलांना एकतर लक्षणे राहत नाही किंवा राहिली तरी सौम्य लक्षणे असतात. यामुळे तातडीने औषधोपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होतो, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. मागील वर्षी मोठ्यांपर्यंत असलेला हा संसर्ग मागील काही आठवड्यांमध्ये लहान मुलांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अनेक कुटुंब दहशतीत आहे. बालरोग तज्ज्ञांच्या मते, पूर्वी बाहेर असलेला विषाणू घराच्या आत शिरला आहे. यामुळे आणखी काळजी घेण्याची गरज आहे. घरी कोणी पॉझिटिव्ह असल्यास मुलांना होम आयसोलेशन करायला हवे. दोन वर्षांवरील मुलगा असेल, त्यांनी मास्क लावायला हवे. आई-वडिलांपासून मुले दूर राहत असतील, तर त्यांना नातेवाइकांच्या घरी पाठवायला हवे. बाधितांच्या संपर्कात आले असतील, तर ‘आरटीपीसीआर’ चाचणी करून घ्यायला हवी. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास बालरोग तज्ज्ञाचा सल्ल्याने औषधोपचार करायला हवे.
-मुलांमध्ये गंभीरतेचे प्रमाण कमी
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनामुळे मुले गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे, परंतु याचे प्रमाण फार कमी आहे. काही मुलांमध्ये जास्त ताप, शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरणे व इतर लक्षणे दिसून येतात. यावर तातडीने उपचार करणे गरजेचे ठरते. लहान मुलांंना मोठ्यांकडूनच लागण होण्याची अधिक शक्यता असते. यामुळे पालकांनी काळजी घ्यायला हवी. महत्त्वाचे काम असेल, तरच घराबाहेर पडावे. मास्क, शारीरिक अंतर व सॅनिटायझेशनचा वापर करावा. घरी आल्यावर आंघोळ करावी. शक्य असल्यास घरीही मास्क वापरावे. मुलांना जवळ घेताना आवश्यक खबरदारी घ्यावी.
-डॉ.अविनाश गावंडे
बालरोग तज्ज्ञ व वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल
-मुलांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत
कोरोनाबाधित जास्तीतजास्त लहान मुलांमध्ये लक्षणे दिसून येत नाही, काहींमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात. त्यांच्यात न्युमोनिआ किंवा इतर गंभीर आजार सहसा दिसून येत नाही, परंतु तरीही बाधितांच्या संपर्कात आल्यास साधारण तिसऱ्या किंवा चवथ्या दिवशी ‘आरटीपीसीआर’ चाचणी करायला हवी. पॉझिटिव्ह अहवाल आल्यास बालरोग तज्ज्ञाकडून औषधोपचार करायला हवे. कोरोनाची लागण मोठ्यांकडून होत असल्याने, त्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे.
-डॉ.वसंत खळतकर
बालरोग तज्ज्ञ
- हे करा
:: प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे.
:: घरी आल्यावर आंघोळ करावी, शक्य असल्यास मुलांपासून दूर राहावे.
:: घरीही मास्क घालावे, मुले २ वर्षांवरील असतील त्यांनीही मास्क लावावे.
:: घरी कोणी पॉझिटिव्ह असल्यास मुलांना होम आयसोलेशन करावे किंवा नातेवाइकांच्या घरी पाठवावे.
:: बाधितांच्या संपर्क आल्यास तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी मुलांची कोरोनाची चाचणी करावी.
:: पॉझिटिव्ह अहवाल आल्यास तातडीने बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
:: रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हायप्रोटीन डाएट, फळे व भरपूर पाणी प्यावे.
:: मुलांनी दोन वेळा ब्रश व दोन वेळा आंघोळ करावी.
:: सध्यातरी ग्रुपमध्ये मुलांनी खेळू नये.