कोरोनामुळे विटा निर्मितीचा व्यवसाय ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:07 AM2021-05-27T04:07:41+5:302021-05-27T04:07:41+5:30
- फोटो समाचारकडून ... आनंद शर्मा नागपूर : लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. कोरोनाचा ...
- फोटो समाचारकडून ...
आनंद शर्मा
नागपूर : लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात झाल्याने विटा निर्मितीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने भर टाकली असून कच्चा माल खराब झाला आहे. त्यामुळे निर्मिती उद्योगांवर परिणाम झाला असून विटांचे दर वाढले आहेत.
नागपूर जिल्ह्यात जवळपास १५० पेक्षा जास्त ठिकाणी विटांची निर्मिती (वीटभट्टे) करण्यात येते. यामध्ये सर्वाधिक निर्मिती रामटेक, पारशिवनी, मौदा आणि सावनेर क्षेत्रात होते. विटा निर्मितीचा सिझन जानेवारी ते मेपर्यंत असतो. यादरम्यान उत्पादनासाठी मालकांना सरकारी खजान्यात पूर्वीच लाखो रुपयांची रॉयल्टी जमा करावी लागते. यावर्षीही सर्वांनी रॉयल्टी भरली. पण मार्चपासून ग्रामीण क्षेत्रात कोरोनाचे संक्रमण वाढल्याने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात विटांचे उत्पादन जवळपास ठप्पच राहिले. याशिवाय काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल खराब झाला आणि कोळशाचे दर वाढल्याने उत्पादनावर परिणाम झाला. शिवाय डिझेलचे दर वाढल्याने विटांच्या वाहतुकीचाही खर्च वाढला. त्यामुळे दर वाढले आहेत. पूर्वी एक हजार विटांचे ६ हजार रुपयांचे दर होते. आता दर ६५०० ते ७ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
सरकारकडे मदतीची मागणी
नाग विदर्भ ब्रिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल मेहाडिया आणि सचिव संजय पालीवाल म्हणाले, कोरोना आणि पावसामुळे विटांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. लाखो रुपयांची रॉयल्टी दिल्यानंतरही उत्पादन ठप्प झाले आहे. अशा स्थितीत विटांच्या उत्पादनासाठी दिलेली तारीख वर्षभर वाढविणे, कोळशाचा सवलतीच्या दरात पुरवठा करणे आणि विटांच्या उत्पादनांसाठी लागणाऱ्या वीजदरात सवलत देण्यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा.