कोरोनामुळे आसनक्षमता निम्मी, भाडे मात्र पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:08 AM2020-12-24T04:08:19+5:302020-12-24T04:08:19+5:30
नागपूर : पश्चिम महाराष्ट्रात कलापोषक वातावरण तयार होण्यास सर्वात मोठा वाटा आहे तो तेथील राजकीय इच्छाशक्तीचा आणि शासन-प्रशासन स्तरावरील ...
नागपूर : पश्चिम महाराष्ट्रात कलापोषक वातावरण तयार होण्यास सर्वात मोठा वाटा आहे तो तेथील राजकीय इच्छाशक्तीचा आणि शासन-प्रशासन स्तरावरील सजगतेचा. तशी इच्छाशक्ती विदर्भात दिसून येत नाही आणि म्हणूनच हरहुन्नरी कलावंत मंडळी असतानाही पुढच्या वाटा निवडू शकत नाही. कोरोना काळात डबघाईला आलेल्या सांस्कृतिक क्षेत्राला उभारी देण्यासाठी तिकडच्या स्थानिक प्रशासन संस्थांनी आपल्या अखत्यारितील नाट्यगृहांचे भाडे तब्बल ७५ टक्क्यानी कमी केले. मात्र विदर्भात त्यासंबंधी विशेष असा रस दिसत नाही, ही विडंबना.
कोरोनाने कंबरडे मोडले, ही ओरड आता जुनी झाली. त्यापुढे जाऊन इतर क्षेत्राप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रालाही आपली करामत दाखवावी लागणार आहे. मात्र सांस्कृतिक क्षेत्राच्या उभारीला कलावंत, आयोजक आणि संबंधित व्यवस्थेचे प्रयत्न पूरक ठरावेत, असे अपेक्षित आहे. त्याच अनुषंगाने नाट्यगृह व्यवस्थापनानेही थोडा फार पुढाकार घेणे गरजेचे आहे. सर्वात मोठा रोडा भाडे आकारणीचाच आहे. कोरोना नियमामुळे आसनक्षमता निम्मी असावी, असा शासनाचा आग्रह आहे. त्यामुळे आपसुकच तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न अर्धे होणार आहे. अशास्थितीत शासकीय बंधनाचे पालन करताना व्यवस्थापनाकडून आयोजकांना सवलत देणे गरजेचे आहे. मात्र तशी तसदी कोणत्याच नाट्यगृह व्यवस्थापनाने घेतलेली नाही. त्यामुळे अद्यापही नाट्य प्रयोग, संगीत प्रयोग आयोजित झालेले नाहीत.
* सभागृहाचे भाडे ४० हजार
महापालिकेच्या सुरेश भट सभागृहाचे भाडे १९८८ आसनासाठी ४० हजार, १५७८ आसनासाठी ३० हजार आणि १३०० आसनासाठी २५ हजार रुपये आहे. कोरोनाअंतर्गत निम्म्या आसनासाठीही एवढेच शुल्क आकारले जात आहे. विना तिकीट कार्यक्रमासाठी व्यवस्थापनाकडून अत्यंत कमी दर आकारले जातात, हे विशेष तर व्यावसायिक प्रतिष्ठानांसाठी दर आणखी जास्त आहेत. देशपांडे सभागृहाचे भाडेही १२ हजाराच्या जवळपास आहे, मात्र तेथूनही सवलत नाहीच.
* व्यवस्थेच्या अनुषंगाने विचार केल्यास भट सभागृहाचे भाडे अत्यंत कमी आहे. मात्र कलावंतांची अशी मागणी असेल तर तसा प्रस्ताव ठेवू. पुढचा निर्णय प्रशासनाचा आहे.
- पीयूष आंबुलकर, क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी, नागपूर महापालिका.
* कलावंत व आयोजकांची मागणी अगदी योग्य आहे. भाडेकपातीचा विषय हाऊसपुढे मांडावा लागतो. आयोजकांनी तसे रीतसर निवेदन दिले तर हा विषय चर्चेत आणून नव्या महापौरांकडे ठेवू आणि भट सभागृहाची भाडेकपात करण्यास आग्रह करू.
- प्रमोद चिखले, क्रीडा सभापती, नागपूर महापालिका.
* देशपांडे सभागृहाबाबत भाडेकपात करण्याचा प्रश्नच येत नाही. एक हजार आसनाची क्षमता असताना प्रेक्षक कमी आले म्हणून भाडे कमी घ्यावे, असा नियम नाही. शिवाय शासनाकडून तसे काेणतेही आदेश आलेले नाहीत.
- जे.एच. भानुसे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर
* पुणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक या भागातील नाट्यगृहांचे भाडे ७५ टक्क्यानी कमी केले आहे. त्याचा लाभ तेथील व्यावसायिक कलावंतांना होत आहे. विदर्भातही अशी सवलत मिळावी, जेणेकरून कलावंत तगतील. ही मागणी दीर्घकाळासाठी नव्हे तर कोरोनाचा ज्वर उतरेपर्यंतची आहे. त्यासाठी आम्ही शासनदरबारी पाठपुरावा करू.
- नरेश गडेकर, उपाध्यक्ष (उपक्रम), अ.भा. मराठी नाट्य परिषद, मुंबई.
......