नागपुरात कोरोना कहर : २१ दिवसात ३२ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 08:15 PM2020-07-21T20:15:06+5:302020-07-21T20:16:15+5:30
कोविड पॉझिटिव्ह आलेल्या आणखी दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यूचे हे सत्र गेल्या नऊ दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या २१ दिवसांत ३२ मृत्यूची नोंद झाली असून मृतांची एकूण संख्या ५६ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड पॉझिटिव्ह आलेल्या आणखी दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यूचे हे सत्र गेल्या नऊ दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या २१ दिवसांत ३२ मृत्यूची नोंद झाली असून मृतांची एकूण संख्या ५६ वर पोहचली आहे. आतापर्यंत ३,०६२ बाधित रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १.८२ टक्के आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या या चार महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद रविवारी झाली. तब्बल सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर सोमवारी दोघांच्या मृत्यूची भर पडली. यात कामठी येथील एक कोविड पॉझिटिव्ह ५५ वर्षीय पुरुष रुग्ण मेयोत उपचार घेत असताना मृत्यू झाला. तर कन्हान येथील ५० वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाचा मेयोत तपासणीसाठी आला असता अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. एकट्या मेयोमध्ये आतापर्यंत ३६ मृत्यूची नोंद झाली. यातील आठ रुग्ण मृतावस्थेतच तर २८ रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यातील ३० नागपूर जिल्ह्यातील तर सहा जिल्ह्याबाहेरील आहेत.
एप्रिल महिन्यात होते दोन मृत्यू
नागपुरात पहिल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद ११ मार्च रोजी झाली. या महिन्यात एकाही मृत्यूची नोंद नव्हती. ४ एप्रिलला सतरंजीपुरा येथील ६४ वर्षीय पुरुष रुग्णाचा मेयोमध्ये मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर, ६ एप्रिलला या मृताचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने पहिल्या मृत्यूची नोंद झाली. याच महिन्यात दुसऱ्या मृत्यूची नोंद १९ एप्रिलला झाली. त्यानंतर मे महिन्यात नऊ, जून महिन्यात १३ तर या महिन्यात ३२ मृत्यू झाले आहेत.
नागपूर जिल्ह्यात ३९ मृत्यू
आतापर्यंत ५६ बाधितांच्या मृत्यूची नोंद असून यातील ३९ मृत नागपूर जिल्ह्यातील आहेत. १७ मृत जिल्ह्याबाहेरील आहेत. अमरावती व अकोला येथील प्रत्येकी एक रुग्ण नागपुरात पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
महिन्यानुसार बळींची संख्या
मार्च ००
एप्रिल ०२
मे ०९
जून १३
जुलै ३२