कोरोनाचा उपराजधानीतील रक्तपेढ्यांंना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:31 PM2020-03-18T12:31:09+5:302020-03-18T12:32:45+5:30

‘कोव्हीड-१९’ या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रक्तदान शिबिरे किंवा स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट आली आहे.

Corona hits blood banks in the Nagpur | कोरोनाचा उपराजधानीतील रक्तपेढ्यांंना फटका

कोरोनाचा उपराजधानीतील रक्तपेढ्यांंना फटका

Next
ठळक मुद्देमेडिकलमध्ये केवळ १२५ रक्त पिशव्या रक्तदान शिबिर घेण्याचे रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोव्हीड-१९’ या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मेळावे, कार्यक्रमावरही निर्बंध घातले आहे. यामुळे रक्तदान शिबिरे किंवा स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. मेडिकलच्या रक्तपेढीत सध्याच्या स्थितीत केवळ १२५ रक्तपिशव्या उपलब्ध आहेत. यातही रक्तगट ‘ए’ आणि ‘एबी’चा तुटवडा पडला आहे. अशीच स्थिती मेयोसह इतरही खासगी रक्तपेढ्यांमधील आहे. त्यामुळे गंभीर शस्त्रक्रियेच्या रुग्णासह, कॅन्सर, थॅलेसेमिया, हिमोफेलिया व सिकलसेलचे रुग्ण अडचणीत आले आहेत.
उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी ६३३ वर खासगी रुग्णालये आहेत. यामुळे विदर्भच नाही तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा येथून रुग्णांचा ओढा नागपूरकडे वाढला आहे. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. यांना रक्तपुरवठा करणाºया चार शासकीयसह नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत. परंतु शासनातर्फे शाळा-महाविद्यालयांना सुटी, मेळावे-कार्यक्रमावर बंदी व घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले जात असल्याने याचा प्रभाव रक्तदानावर झाला आहे. शिवाय, काही रक्तदात्यांमध्ये कोरोनाची भीती किंवा संभ्रम निर्माण झाल्याने स्वेच्छा रक्तदानही फार कमी झाले आहे. शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तपिशव्यांचा अपुरा साठा आहे. यावर उपाय म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेने आवश्यक सूचना जारी केल्या आहेत.
यात रक्तदात्यांची कोरोना विषाणूबाबतची लक्षणे व प्रवासाचा पूर्वेतिहास तपासून, सुरक्षा व स्वच्छतेचे पालन करून तसेच रक्तदानाच्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थित नियमन करून रक्तदान शिबिर आयोजित करावे, अश सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने जारी केल्या आहेत.

कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान करण्यास घाबरू नका
रक्तदान केल्यामुळे किंवा रक्त संक्रमणामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही. यामुळे स्वेच्छा रक्तदात्यांनी रक्तदान करावे. सामाजिक संस्था, धार्मिक संस्था यांनीही पुढाकार घेऊन रक्तदाते रक्तपेढीत पाठवावे. यामुळे अपघाताच्या जखमींना, गंभीर शस्त्रक्रियेच्या रुग्णांना व कॅन्सर, थॅलेसेमिया, सिकलसेल आणि हिमोफेलियाच्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होईल.
-डॉ. संजय पराते, प्रमुख, आदर्श रक्तपेढी मेडिकल

Web Title: Corona hits blood banks in the Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.