कोरोनामुळे आईस्क्रीम उद्योगाला ४०० कोटींचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 01:20 PM2021-05-03T13:20:50+5:302021-05-03T13:22:14+5:30
Nagpur News कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे नागपुरातील लहान-मोठ्या ३० पेक्षा जास्त आईस्क्रीम उत्पादकांना आणि ५०० पेक्षा जास्त आईस्क्रीम पार्लरला यंदा उन्हाळ्यात आतापर्यंत जवळपास ४०० कोटींचा फटका बसला आहे. उद्योग बंद असल्याने दुधासह कच्च्या मालाची विक्री थांबली आहे.
मोरेश्वर मानापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे नागपुरातील लहान-मोठ्या ३० पेक्षा जास्त आईस्क्रीम उत्पादकांना आणि ५०० पेक्षा जास्त आईस्क्रीम पार्लरला यंदा उन्हाळ्यात आतापर्यंत जवळपास ४०० कोटींचा फटका बसला आहे. उद्योग बंद असल्याने दुधासह कच्च्या मालाची विक्री थांबली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व निर्मिती उद्योग बंद असून, त्यामुळे हजारो युवकांचा रोजगार बुडाला आहे. १५ मेपर्यंत असलेल्या लॉकडाऊनने नुकसानीत आणखी भर पडणार आहे.
कोरोना लॉकडाऊनचा परिणाम सर्वच उद्योगधंद्यांवर पडला आहे. आईस्क्रीम उद्योगही अपवाद नाही. उत्पादक कंपन्यांपासून आईस्क्रीम पार्लरपर्यंत सर्वांना आर्थिक फटका बसला आहे. हे नुकसान भरून निघणे कठीण असल्याचे मत पार्लरच्या संचालकांनी व्यक्त केले.
आईस्क्रीम उद्योगाचा पीक सिझन मार्चपासून सुरू होऊन जूनच्या अखेरपर्यंत चालतो. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही आईस्क्रीमची मागणी लॉकडाऊनने ठप्प झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्व दुकाने आता सकाळी ११ पर्यंत सुरू आहेत. पण या वेळात आईस्क्रीम पार्लरमध्ये खरेदीसाठी कुणीही जात नाहीत. १५ मेनंतर लॉकडाऊन वाढल्यास संपूर्ण सीझन विक्रीविना जाणार आहे. विक्रीच नसल्यामुळे आईस्क्रीम कंपन्यांनी उत्पादन बंद केले तर काही मोठ्या कंपन्यांनी थोडेफार सुरू ठेवले. परराज्यातील कंपन्यांच्या आईस्क्रीमची नागपुरात आवक अल्पशी आहे. त्याचा परिणाम असा झाली की, आईस्क्रीम निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाला मागणी नाहीच. कंपन्या बंद झाल्याने हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. याशिवाय विक्री पार्लरमधील कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला आहे. या उद्योगातील सर्वच रोजगार ठप्प झाला आहे.
उन्हाळ्यात होते वर्षभराची कमाई
उन्हाळ्यात आईस्क्रीमप्रमाणे कुल्फी आणि बर्फगोळ्यांनाही मागणी असते. पण यंदा दुकाने थाटली नाहीत. परिणामी कंपन्यांनी बर्फनिर्मिती बंद केली आहे. लग्नसमारंभ नसल्याने मागणीच ठप्प झाली आहे. याशिवाय कुल्फीचा उद्योगही ठप्प झाला आहे. कोरोना संकटातून बाहेर निघण्यास आणखी काही महिने लागतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
डॉक्टर म्हणतात आईस्क्रीम खाऊ नका!
कोरोना काळात आईस्क्रीम न खाण्याचा आणि फ्रीजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. थंड आईस्क्रीम खाल्ल्याने सर्दी आणि खोकल्याचा त्रास उद्भवू शकतो. डॉ. प्रसाद वरदळकर म्हणाले, कोरोना काळात थंड पेय किंवा आईस्क्रीमचे सेवन न केलेले बरे. सर्दी आणि खोकल्यापासून जेवढे दूर राहता येईल, तेवढे चांगले. सोशल मीडियावरही असेच सल्ले डॉक्टर देताना दिसत आहेत. याच कारणांनी अनेकांनी आईस्क्रीम पार्लरकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
फळांची विक्री वाढली
कोरोना रुग्ण असो वा सर्वसामान, सर्वांना इम्युनिटी वाढविण्यासाठी फळे जास्तीत जास्त खाण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्यामुळे सकाळीच फळांची दुकाने आणि हातठेल्यावर फळे खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच फळांचे दर वाढले आहेत. प्रथिनेयुक्त फळे डाळिंब आणि सफरचंद प्रति किलो २०० रुपयापेक्षा जास्त दराने विकली जात आहेत.