‘कोरोना’ची सुटी ‘एन्जॉय’साठी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 10:50 AM2020-03-16T10:50:13+5:302020-03-16T10:52:07+5:30
महाविद्यालयांतील अध्यापनाचे कार्य ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत जर ते शहरात अनावश्यकपणे फिरताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सुट्यांसंदर्भात परिपत्रक काढले आहे. त्यानुसार सर्व विभाग, संचालित व संलग्नित महाविद्यालयांतील अध्यापनाचे कार्य ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांनी वसतिगृह किंवा घरातच थांबावे. जर ते शहरात अनावश्यकपणे फिरताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू झाल्यानंतर सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात यावी, असे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून पत्र आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनातर्फे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी रविवारी परिपत्रक जारी केले. सर्व विभाग, महाविद्यालयांतील अध्यापनाचे कार्य ३१ मार्चपर्यंत बंद राहील. परंतु प्रशासकीय व इतर कामकाज सुरू राहील, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे, ते अनावश्यकपणे फिरणार नाहीत.
ते संबंधित वसतिगृहे किंवा घरी स्वत:ला सुरक्षित ठेवतील. ते अनावश्यक फिरणार नाहीत, अशी सूचना महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना द्याव्यात. जर कुणी अनावश्यकपणे फिरताना दिसून आला तर त्यांच्या विरोधात कारवाई होईल, असे त्यांना सांगण्यात यावे, असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी
वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृहातील विद्यार्थी मूळ गावी परत जाऊ शकतात. जर ते गावी गेले नाही तर त्यांनी वसतिगृहातून बाहेर पडू नये, असे विद्यापीठाने सांगितले आहे. ३१ मार्चपर्यंतच्या कालावधीत विद्यापीठातील ‘कमवा व शिका’ योजना, व्यायाम शाळा, उद्यान, अतिथीगृह व इतर क्रीडा सुविधा बंद राहतील.
फिरण्याची सुविधा बंद
विद्यापीठातील ‘कॅम्पस’, ‘एलआयटी’ येथे अनेक जण ‘मॉर्निंग वॉक’ला जातात. मात्र ही सुविधा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात सर्व अभ्यागतांना पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश बंद करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विद्यापीठाचे ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात येणार आहे.