लॉयड स्टील प्लॅन्टजवळ १५०० खाटांचे कोरोना रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:08 AM2021-04-23T04:08:34+5:302021-04-23T04:08:34+5:30
नागपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वर्धा येथील लॉयड स्टील प्लॅन्टजवळ गरजेनुसार १००० ते १५०० खाटांचे कोरोना ...
नागपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वर्धा येथील लॉयड स्टील प्लॅन्टजवळ गरजेनुसार १००० ते १५०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारले जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
सदर रुग्णालय तातडीने कार्यान्वित करण्यासाठी युद्धस्तरावर कामे केली जात आहेत. येत्या एका महिन्यात रुग्णालयाचे बहुतांश काम पूर्ण होईल, अशी ग्वाही संजीवकुमार यांनी दिली. उच्च न्यायालयाने याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयाची प्रशंसा केली. कोरोना रुग्णांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणारे हे खूप मोठे पाऊल आहे. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. हे रुग्णालय येत्या १५ ते २० दिवसात कार्यान्वित झाल्यास कोरोना रुग्णांना आणखी जास्त लाभदायक ठरेल. यासंदर्भात काही अडचणी असल्यास विभागीय आयुक्तांनी त्या न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणाव्यात. त्यावर योग्य पद्धतीने तोडगा काढला जाईल, असे न्यायालयाने सांगितले.