कोरोनामुळे हजयात्रेचा खर्च सव्वा लाखाने वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 10:19 AM2020-11-09T10:19:10+5:302020-11-09T10:19:35+5:30
Nagpur News Hajj Yatra हज कमिटी ऑफ इंडियाद्वारे घोषित हज यात्रा-२०२१ च्या गाईड लाईन व अॅक्शन प्लॅननुसार यावर्षी हज यात्रेकरूंना यात्रेसाठी ३ लाख ७५ हजार रुपये भरावे लागणार आहेत.
रियाज अहमद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ संसर्गाच्या कारणामुळे यावेळी हज यात्रेसाठी अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात्रेचा खर्च सवा लाखाने वाढविण्यात आला आहे. हज कमिटी ऑफ इंडियाद्वारे घोषित हज यात्रा-२०२१ च्या गाईड लाईन व अॅक्शन प्लॅननुसार यावर्षी हज यात्रेकरूंना यात्रेसाठी ३ लाख ७५ हजार रुपये भरावे लागणार आहेत. सुरुवातीला दीड लाख रुपये जमा करावे लागतील. २०१९ ला हज यात्रेचा खर्च अडीच लाख रुपये होता आणि सुरुवातीला ८१ हजार रुपये जमा करावे लागत होते.
विशेष म्हणजे आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी, या भावनाने मुस्लिम बांधव अनेक वर्षांपासून पैसा गोळा करून ठेवतात. मात्र यावेळी यात्रा महाग झाल्याने समस्या आली आहे. केंद्रीय हज कमिटीनुसार कोरोनाच्या कारणामुळे जागांचा कोटासुद्धा कमी करून एक तृतीयांश करण्यात आला आहे. मागील वर्षी देशभरातून खासगी आयोजकांना धरून यात्रेकरूंसाठी १ लाख ७० हजार जागा निर्धारित करण्यात आल्या होत्या. मात्र यावर्षी केवळ ५० हजार सीट राहण्याची शक्यता आहे. प्रवाशांची संख्या कमी झाल्याने विमान भाडे, निवास व्यवस्था, भोजन, एअरपोर्ट शुल्क, आरोग्य, गाईड, बससह सर्व व्यवस्थेचा खर्च दुप्पट होणार आहे. याशिवाय शासनाने यावेळी नागपुरातून हजयात्रेसाठी विमानसेवा रद्द केली आहे. विशेष म्हणजे दरवर्षी विदर्भासह मध्य प्रदेश व छत्तीसगडचे हज प्रवासी नागपुरातूनच रवाना हाेत हाेते. त्यामुळे हजयात्रेचा खर्च वाढणे व नागपुरातून विमान रद्द करण्याचाही विराेध केला जात आहे.
विमान भाड्यासह खर्च दुप्पट काेराेना संसर्गाच्या धाेक्यामुळे यावेळी हजयात्रेच्या प्रवाशांचा काेटा एक तृतीयांश राहणार आहे. प्रवाशांची संख्या कमी असल्याने विमान भाड्यासह सर्व व्यवस्थेचा खर्च दुप्पट हाेणार आहे. त्यामुळे यावेळी हजयात्रा महाग ठरणार आहे.
- डॉ. मकसूद अहमद खान, सीईओ, हज कमिटी ऑफ इंडिया
नागपूर इंबार्केशन पाॅईंट सुरू ठेवा
सीटीसी सचिव हाजी मो. कलाम यांनी नागपूर विमान रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. विदर्भासह छत्तीसगड व मध्य प्रदेशाचे हज प्रवासी येथून रवाना हाेतात. त्यामुळे नागपुरातून हजसाठी विमानसेवा सुरू ठेवावी.
हज यात्रा खर्च वाढविण्याचा निषेध
कांग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव शहबाज सिद्दिकी यांनी हज यात्रेचा खर्च वाढविण्याच्या निर्णयाचा कठाेर शब्दात निषेध केला. यामुळे प्रवाशांना आर्थिक भार साेसावा लागेल. शिवाय नागपुरात हज यात्रेची विमानसेवा रद्द करणेही चुकीचे आहे. येथून चालणारी सेवा सर्वांसाठी सुविधाजनक असल्याचे ते म्हणाले. नागपुरातून विमानसेवा सुरू राहावी
नागपूर मेट्रो पॉलिटन सिटी व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्यामुळे विमानसेवा बंद करणे चुकीचे आहे़, असे मत नगरसेवक जुल्फेकार अहमद भुट्टो यांनी व्यक्त केले. विदर्भासह मध्य प्रदेश व छत्तीसगडमधून येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेचा विचार करणे गरजेचे आहे.