१२ वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:11 AM2021-09-08T04:11:54+5:302021-09-08T04:11:54+5:30
नागपूर : ग्रामीण भागातील दोन वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद होताच मंगळवारी खळबळ उडाली. नागपूर ...
नागपूर : ग्रामीण भागातील दोन वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद होताच मंगळवारी खळबळ उडाली. नागपूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली. शहरात ८ तर ग्रामीणमध्ये १० असे एकूण १८ रुग्ण आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या ४,९३,०९० झाली असून मृतांची संख्या १०,११९वर स्थिर आहे.
वानाडोंगरी येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या पहिल्या बॅचमधील १५० विद्यार्थ्यांमधून १०० विद्यार्थी महाविद्यालयातील वसतिगृहात तर ५० विद्यार्थी महाविद्यालयाबाहेर निवासाला आहेत. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे यांनी सांगितले, दोन दिवसापूर्वी दोन मुलींना ताप आला. डेंग्यूसदृश म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या ६० विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल येईपर्यंत सर्वांना वसतिगृहातच क्वारंटाईन करण्यात आले होते. मंगळवारी यातील ९ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या ११ विद्यार्थ्यांना महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या श्रीमती शालिनीताई मेघे रुग्णालयाच्या एका वॉर्डात भरती करण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. बाधित विद्यार्थ्यांमध्ये १० मुली व १ मुलगा आहे, असेही डॉ. गोडे यांनी सांगितले. यासोबतच डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमधील एमबीबीएसचा १ विद्यार्थी पॉझिटिव्ह आला. हा विद्यार्थी काही दिवसांपूर्वीच पाटणा येथून आला होता. या विद्यार्थ्याच्या संपर्कातील चार विद्यार्थ्यांचे आरटीपीसीआरचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. याला हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा यांनी दुजोरा दिला. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
- दोन महिन्यानी ग्रामीणमध्ये दुहेरी आकडा
नागपूर जिल्ह्यात १० जुलै रोजी २६ रुग्ण आढळून आले होते. यातील १३ रुग्ण ग्रामीणमधील होते. त्यानंतर जवळपास दोन महिन्यानी आज रुग्णांचा दुहेरी आकडा, १० रुग्ण आढळून आले. सात दिवसात ग्रामीणमध्ये १२ रुग्णांची नोंद झाली आहे.
-आराेग्य यंत्रणेची वाढली चिंता
नागपूर जिल्ह्यात ३ सप्टेंबर रोजी कोरोनाचा केवळ १ रुग्ण असताना, ५ सप्टेंबर रोजी १०, ६ सप्टेंबर रोजी १२ तर आज रुग्णांची संख्या १८ झाली. वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आज ४,५३४ चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हीटीचा दर ०.४ टक्क्यांवर आला आहे. सध्या कोरोनाचे ६५ ॲक्टिव्ह असून यात शहरातील ४६, ग्रामीणमधील १५ व जिल्हाबाहेरील ४ रुग्ण आहेत. सर्व रुग्ण शासकीयसह खासगी हॉस्पिटल व कोविड केअर सेंटरमध्ये भरती आहेत.
-कोरोनाचा वाढता ग्राफ
तारीख : रुग्ण
१ सप्टेंबर : ०६
२ सप्टेंबर : ०६
३ सप्टेंबर :०१
४ सप्टेंबर : ०७
५ सप्टेंबर : १०
६ सप्टेंबर : १२
७ सप्टेंबर :१८
:: कोरोनाची मंगळवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ४५३४
शहर : ८ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : १० रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९३,०९०
ए. सक्रिय रुग्ण : ६५
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,९०६
ए. मृत्यू : १०,११९