सहा दिवसांअगोदर कोरोनाची लागण अन् आमदार आंदोलनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 08:12 PM2022-01-18T20:12:48+5:302022-01-18T20:13:31+5:30
Nagpur News काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पूर्व नागपुरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. १३ जानेवारी रोजीच कोरोनाची लागण झालेले पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे हे विलगीकरण सोडून चक्क आंदोलनात उतरल्याचे दिसून आले.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पूर्व नागपुरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. एकीकडे कोरोनाचा विळखा वाढत असताना दुसरीकडे प्रचंड गर्दीत हे आंदोलन करण्यात आले. आश्चर्याची बाब १३ जानेवारी रोजीच कोरोनाची लागण झालेले पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे हे विलगीकरण सोडून चक्क आंदोलनात उतरल्याचे दिसून आले. पक्षावर खरोखरच इतके मोठे संकट आले होते का, की खोपडे यांना कोरोनाच्या नियमावलीचे भानदेखील राहिले नाही, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
१३ जानेवारी रोजी खोपडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांनीच सोशल माध्यमांवरून सर्वांना ती माहिती दिली. त्यानंतर ते गृहविलगीकरणात होते. मंगळवारी भाजपतर्फे सुभाष पुतळा ते लकडगंज पोलीस ठाण्यापर्यंत छोटेखानी रॅली काढण्यात आली. यात कृष्णा खोपडे सहभागी झाले होते. यावेळी शंभराहून अधिक कार्यकर्तेदेखील होते.
परवानगीनंतरच घराबाहेर पडलो : खोपडे
मी १२ जानेवारी रोजी केलेल्या कोरोना चाचणीनंतर १३ तारखेला माझा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मी पाच दिवस गृहविलगीकरणातच होतो. मनपाचे आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांच्याशी संपर्क साधला. कुठलीच लक्षणे नसतील तर तीन दिवसानंतर तुम्ही बाहेर पडू शकता, असे त्यांनी सांगितले होते. पाच दिवस घरीच राहिलो. चिलकरांना मंगळवारी सकाळीदेखील फोन केला. बाहेर निघण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितल्याने मी आंदोलनात सहभागी झालो, अशी भूमिका खोपडे यांनी मांडली.
चिलकर म्हणतात, गृहविलगीकरण आवश्यकच
याबाबत चिलकर यांच्याशी संपर्क केला असता, खोपडे यांना केवळ कोरोना प्रोटोकॉलची माहिती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जास्त लक्षणे नसल्यास सात दिवस गृह विलगीकरण आवश्यकच आहे. शेवटचे तीन दिवस कुठलीही लक्षणे नसतील तर चाचणीविना बाहेर पडता येते. खोपडे यांनी ते पॉझिटिव्ह असल्याची कुठलीही माहिती मला दिली नव्हती.
बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात
पटोले यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी पोलीस ठाण्यासमोर केलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेऊन ठाण्यासमोरच निदर्शनांसह आंदोलन सुरू केले. तणाव वाढल्याने दुपारी १ वाजताच्या सुमारास बावनकुळे व सुमारे ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
...