ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा दर ३४ टक्क्यांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:09 AM2021-05-11T04:09:04+5:302021-05-11T04:09:04+5:30
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र रविवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ...
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र रविवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ग्रामीण भागात संक्रमणाचा दर हा ३४ टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून आले. तेरा तालुक्यांत करण्यात आलेल्या ३,३११ चाचण्यांपैकी १,१४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर १० रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत २,०६६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत १,३०,९६८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. सोमवारी २,४६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता १,०३,८५५ इतकी झाली आहे. सध्या ग्रामीण भागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २४,९७२ इतकी आहे.
सावनेर तालुक्यात ६६ रुग्णांची भर पडली. यात सावनेर शहरातील १५, तर ग्रामीणमधील ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. कामठी तालुक्यात ३७२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
नरखेड तालुक्यात ७८ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील १६, तर ग्रामीण भागातील ६२ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुणांची संख्या २,१८० तर शहरात ४६८ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावांत (९), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (२७), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (१) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांत २५ रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ३७१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५७ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात रामटेक शहरातील १७ तर ग्रामीण भागातील ४० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कचारीसावंगा केंद्रांतर्गत १०, कोंढाळी केंद्रांतर्गत (११), तर येनवा केंद्रांतर्गत १९ रुग्णांची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ५३७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला. वानाडोंगरी येथे ९, हिंगणा (५), रायपूर (२), तर वाघदरा गुमगाव, इसासनी, डिगडोह, मोहगाव झिल्पी, किन्ही धानोली व कान्होलीबारा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ११,०६६ झाली आहे. यातील ८,९१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तालुक्यात आतापर्यंत २४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कुही तालुक्यात २२८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही येथे ०२, मांढळ (१४), तितूर (१३) तर वेलतूर व साळवा येथे प्रत्येकी ५ रुग्णांची नोंद झाली. उमरेड तालुक्यात ६५ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये शहरातील २१ तर ग्रामीण भागातील ४४ रुग्णांचा समावेश आहे.
रामटेक तालुक्यात ९ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील २ तर ग्रामीण ७ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६,३४० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यातील ५,०३१ कोरोनामुक्त झाले. तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,३०९ इतकी आहे.
कळमेश्वरला दिलासा
कळमेश्वर तालुक्यात सोमवारी मोठा दिलासा मिळाला. तालुक्यात ३३ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील १८, तर ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात गोंडखैरी ४, धापेवाडा, सावंगी प्रत्येकी २ तर सेलू, लोणारा, बोरगाव बु., मोहपा, देवबरडी, तिष्टी बु., नादीखेडा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.