नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव? बड्या नक्षल नेत्याला लागण झाल्याची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 08:02 PM2022-01-10T20:02:15+5:302022-01-10T20:02:50+5:30
Nagpur News नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कोरानेने शिरकाव केल्याची आणि बंदिस्त असलेल्या एका बड्या नक्षल नेत्याला कोरोनाची बाधा झाल्याची जोरदार चर्चा आहे.
नागपूर : मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कोरानेने शिरकाव केल्याची आणि बंदिस्त असलेल्या एका बड्या नक्षल नेत्याला कोरोनाची बाधा झाल्याची जोरदार चर्चा आहे. कारागृह प्रशासनाने या संबंधाने बोलण्याचे टाळल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात मुंबईसह विविध बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा ठोठावलेले सिद्ध दोष कैदी, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी, नक्षल नेता जी. एन. साईबाबा याच्यासह अनेक गँगस्टर तसेच कैदी बंदिस्त आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत त्यांच्यातील अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली होती. आता कोरोनाची तिसरी लाट आली असताना मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या एका बड्या नक्षल नेत्याला कोरोनाची लागण झाल्याची जोरदार चर्चा आहे. ही चर्चा खरी की खोटी या संबंधाने कारागृहाचे अधीक्षक अनुप कुमरे यांच्याशी दिवसभरात वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कोरोनाबाबतची चर्चा खरी की खोटी ते स्पष्ट होऊ शकले नाही.
आपल्याकडे अहवाल नाही : साठे
कोरोनासंदर्भात कारागृह अधीक्षकांकडून मौन पाळण्यात आल्यामुळे कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता, या संबंधाने आपल्याकडे अद्याप असा कोणताही अहवाल आला नाही, असे त्या म्हणाल्या.