CoronaVirus in Nagpur : नागपुरातील सीए रोड, हावरापेठमध्ये कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:28 PM2020-05-26T23:28:37+5:302020-05-26T23:33:55+5:30
रमजानचा महिना असल्याने एका डॉक्टरने खासगी हॉस्पिटलमधून सुटी घेऊन गोरगरिबांना सेवा दिली. याच दरम्यान त्यांनी सीए रोडवरील भिकाऱ्यालाही तपासले. तीन दिवसापूर्वी तो भिकारी पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून डॉक्टरने खासगी लॅबमधून नमुना तपासला असता सोमवारी रात्री अहवाल पॉझिटिव्ह आला. आज ते स्वत:हून मेयोमध्ये दाखल झाले. सामाजिक कार्य करताना कोरोनाबधित होण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. नागपुरात आज चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील एक रुग्ण हावरापेठ या नव्या वसाहतीमधील आहे. रुग्णांची संख्या ४३३ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रमजानचा महिना असल्याने एका डॉक्टरने खासगी हॉस्पिटलमधून सुटी घेऊन गोरगरिबांना सेवा दिली. याच दरम्यान त्यांनी सीए रोडवरील भिकाऱ्यालाही तपासले. तीन दिवसापूर्वी तो भिकारी पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून डॉक्टरने खासगी लॅबमधून नमुना तपासला असता सोमवारी रात्री अहवाल पॉझिटिव्ह आला. आज ते स्वत:हून मेयोमध्ये दाखल झाले. सामाजिक कार्य करताना कोरोनाबधित होण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. नागपुरात आज चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील एक रुग्ण हावरापेठ या नव्या वसाहतीमधील आहे. रुग्णांची संख्या ४३३ झाली आहे. रामदासपेठ येथील एका खासगी हॉस्पिटलमधील ४० वर्षीय डॉक्टर कार्यरत आहे. रमजान निमित्त लोकांची सेवा करण्यासाठी काही दिवसापूर्वी त्यांनी सुटी घेतली. मोमीनपुरा, सतरंजीपुरा वसाहतीत जाऊन रुग्णांची सेवा दिल्याचेही समजते. एवढेच नव्हे तर क्वारंटाईन सेंटरमध्ये जाऊन संशयित रुग्णांचे समुपदेशनही ते करीत होते. काही दिवसापूर्वी सीए रोडवरील एका भिकाऱ्याची प्रकृती खालावल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याची तपासणी करून औषधे दिली. परंतु जेव्हा एका पोलिसाने त्या भिकाऱ्याला मेयोत दाखल करून चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आला तेव्हा डॉक्टरने खासगी प्रयोगशाळेतून नमुना तपासून घेतला. आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या तीन झाली आहे. डॉक्टर सीए रोडच्या परिसरात राहतात. यामुळे बुधवारी हा परिसर सील होण्याची शक्यता आहे.
बुटीबोरीत पुन्हा एका रुग्णाची नोंद
२३ मे रोजी मुंबईहून बुटीबोरी आपल्या स्वगृही परतलेल्या २७ वर्षीय मुलापासून त्याचे ५२ वर्षीय वडिलांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या घरातील सदस्यांचे नमुने तपासले असता २३ वर्षीय मुलीचा नमुना आज पॉझिटिव्ह आला. या तिघांवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. मेयोच्या प्रयोगशाळेने तपासलेल्या नमुन्यात दोन पॉझिटिव्ह आले. यात एक मोमीनपुरा येथील तर एक टिपू सुलतान चौक, राणी दुर्गावतीनगर येथील आहे. हे दोन्ही रुग्ण पाचपावली पोलीस क्वॉर्टरमध्ये क्वारंटाईन होते. या शिवाय हावरापेठ आेंकारनगर येथील ५७ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आली. या रुग्णाने खासगी प्रयोगशाळेत नमुने तपासले होते. पहिल्यांदाच हावरापेठमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या रुग्णाला कुठून लागण झाली याची माहिती घेतली जात आहे.
मेयो, मेडिकलमधील ७६ मधून ७० रुग्णांना लक्षणेच नाहीत
कोविड रुग्णांच्या नव्या डिस्चार्ज धोरणानुसार मागील काही दिवसात मोठ्या संख्येत रुग्णांना सुटी देण्यात आली. यामुळे सध्याच्या स्थितीत मेयोमध्ये २६ तर मेडिकलमध्ये ५० असे एकूण ७६ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ७० रुग्णांना कुठलीच लक्षणे नाहीत. केवळ ६ रुग्णांना लक्षणे असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आज मेयोमधून संतोषीनगर नारा येथून एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ३५७ झाली आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १२९
दैनिक तपासणी नमुने २००
दैनिक निगेटिव्ह नमुने १९७
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ४३३
नागपुरातील मृत्यू ०८
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३५७
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २४८६
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १६८१
पीडित-४३३-दुरुस्त-३५७-मृत्यू-८