नागपूरच्या मनोरुग्णालयातही कोरोनाचा शिरकाव; १० महिला रुग्णांना लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 07:10 AM2022-01-16T07:10:00+5:302022-01-16T07:10:02+5:30
Nagpur News पोलिसांनी एका अनोळखी मनोरुग्ण महिलेला प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती केले. गुरुवारी तिचा अहवाल पॉझिटिव्ह येताच, तिच्या संपर्कात आलेल्या २८ रुग्ण महिलांची चाचणी करण्यात आली. यातील ९ महिला पॉझिटिव्ह आल्या.
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली. बुधवारी पोलिसांकडून भरती केलेल्या एका अनोळखी मनोरुग्णाचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने, तिच्या संपर्कात आलेल्या २८ महिला रुग्णांची तपासणी केली असता, शनिवारी ९ महिला पॉझिटिव्ह आल्या. या १० रुग्णांना इतर रुग्णांपासून दूर ठेवण्यात आले आहे.
मागील तीन आठवड्यांपासून कोरोना झपाट्याने पसरत आहे. दररोज दुपटीने रुग्ण वाढत आहे. ज्या रुग्णांना स्वत:चे भान राहत नाही, त्यांनाही कोरोना होऊ लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. प्राप्त माहितीनुसार, १२ जानेवारी रोजी पोलिसांनी एका अनोळखी मनोरुग्ण महिलेला प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती केले. त्यापूर्वी पोलिसांनी केलेल्या तिच्या अँटिजन तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. नियमानुसार, गुरुवारी रुग्णालय प्रशासनाकडून तिची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह येताच, शुक्रवारी तिच्या संपर्कात आलेल्या २८ रुग्ण महिलेची चाचणी करण्यात आली. शनिवारी यातील ९ महिला पॉझिटिव्ह आल्या. या सर्वांना एका स्वतंत्र वॉर्डात क्वारंटाईन करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
दुसऱ्या लाटेत कोरोनाचे २५० रुग्ण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मनोरुग्णालयातील २५० रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी रुग्णालयातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर, संसर्ग हा वाढत गेला. काही रुग्णांना मेडिकलमध्ये भरती करण्याची वेळ आली होती, परंतु कोणाचा मृत्यू झाला नाही.
-काहींना सौम्य तर काहींना लक्षणेच नाही
मनोरुग्णालयात पॉझिटिव्ह आलेल्या १० महिलांमधून तीन ते चार महिला रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. इतरांना लक्षणे नाहीत. या रुग्णांना स्वतंत्र वॉर्डात ठेवण्यात आले आहे. दिवसांतून चार वेळा त्यांचे ऑक्सिजन लेव्हल, तापमान व रक्तदाबाची नोंद घेतली जात आहे.
- डॉ.पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय