नागपुरात कोरोनाचा शिरकाव : एक आढळला पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 10:50 PM2020-03-11T22:50:55+5:302020-03-11T22:52:02+5:30
जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूने नागपुरातही शिरकाव केला आहे. नागपुरातील सात संशयित रुग्णांपैकी एकजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागपुरातच नाही तर राज्यभरात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूने नागपुरातही शिरकाव केला आहे. नागपुरातील सात संशयित रुग्णांपैकी एकजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागपुरातच नाही तर राज्यभरात खळबळ उडाली आहे. मेयो इस्पितळात दाखल झालेल्या संबंधित रुग्णाचे नमुने बुधवारी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. रात्री उशीरा या रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला असता त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पॉझिटिव्ह आढळून आलेला हा रुग्ण काही दिवसांपूर्वी ६ मार्चला अमेरिकेहून परत आला होता. त्याला साधारण ताप आहे, मात्र इतर लक्षणे नाही. बुधवारी तपासणीसाठी तो मेयो रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान त्याचा अहवाल प्राप्त झाला व त्यात त्याला कोरोनाचा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित रुग्णास मेयोच्या वार्ड क्रमांक २४ मध्ये भरती करण्यात आले आहे. या रुग्णास किंचीत ताप असून इतर लक्षणे नाहीत. मात्र नागपूरला आल्यानंतर ६ मार्चपासून तो कोणाकोणाच्या संपर्कात आला याबाबत माहिती घेतली जात आहे. मेयोमध्ये बुधवारी तीन संशयितांना दाखल करण्यात आले होते व त्यांचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील या संशयिताचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.
दरम्यान बुधवारी मेडिकलमध्येही चार संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. या चारही रुग्णांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यातील दोघे कोरोना विषाणू बाधित नसल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित रुग्णांचे अहवाल गुरुवारी मिळणार आहेत. इतर रुग्णांचे नमुनेही गुरुवारीच पाठविण्यात येतील. दरम्यान पुण्यातील कोरोना बाधितासोबत प्रवास करून आलेल्या नागपूरच्या ३ व यवतमाळच्या १० प्रवाशांना कुठलेही लक्षणे आढळून आले नसले तरी सतर्कता म्हणून आरोग्य विभागातर्फे त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.संपूर्ण जगावर भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात वेगाने होत असून भारतातही संशयित व बाधित रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे.
दुबईहून परतलेल्या प्रवाशांची मेडिकलमध्ये तपासणी
दुबईहून प्रवास करून आलेले पुण्याचे दोन प्रवासी कोरोना बाधित असल्याचे आढळल्यानंतर संपूर्ण राज्यात सतर्कता वाढविण्यात आली आहे. या बाधितांसोबत दुबई प्रवासाला गेलेल्या सहप्रवाशांचा शोध घेतल्यानंतर आरोग्य विभागाला यवतमाळ जिल्ह्यातील १० तर नागपुरातील तीन प्रवासी आढळून आले. कोरोना विषाणू रुग्णासोबत प्रवास करून आलेल्या नागपुरातील एकाच कुटुंबातील तीन सदस्य आहेत. यात त्यांचा मुलगा पुण्यात थांबला असून, त्याचे आई-वडील नागपुरात आले आहेत. पुण्यात मुलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. नागपूरला आलेल्या आईवडिलांशी मेडिकलने संपर्क साधल्यावर त्यांना कोरोनाशी संबंधित कुठलीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यांचे नमुने घेण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले. मात्र खबरदारी म्हणून दोघांनाही सार्वजनिक ठिकाणी न जाता घरीच थांबण्याच्या सुचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे यवतमाळ येथील दहाही प्रवाशांची प्रकृती बरी असल्याने आणि कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. यामुळे त्यांचे नमुने घेण्यात आलेले नाहीत. परंतु त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जर्मनीचा रुग्ण मेडिकलमध्ये दाखल
मेडिकल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जर्मनी रहिवासी नागरिकाला बुधवारी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. हा नागरिक काही कामानिमित्त नागपूरला आला होता. त्याला ताप, खोकला व अंगदुखी आदी कोरोना संशयित लक्षणे आढळून आल्याने रात्री मेडिकलमध्ये भरती ठेवण्यात आले आहे. त्याचे नमुने गुरुवारी मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
आतापर्यंत १४ संशयित
गेल्या दिवसांपासून मेडिकलमध्ये दाखल होणाºया कोरोना व्हायरस संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारपर्यंत संशयितांची संख्या १४ वर पोहचली आहे. यापूर्वी ७ कोरोना संशयित रुग्ण मेडिकलच्या कोरोना रुग्णांसाठी सज्ज केलेल्या वार्ड क्र. २५ मध्ये दाखल झाले होते. मात्र त्यांच्यातील एकही रुग्णात कोरोना विषाणूचा संसर्ग आढळून आला नाही, त्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली.